

Maharashtra opposition
नागपूर : दोन दिवसांपासून वाढलेल्या थंडीत राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सोमवारपासून (दि.८) नागपुरात सुरू होत आहे. केवळ आठवडाभर 14 डिसेंबरपर्यंतच कामकाज होणार आहे. उद्या रविवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या रामगिरी या शासकीय निवासस्थानी चहापान, राज्य मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे.
विरोधक नेहमीप्रमाणे चहापानावर बहिष्कार घालण्याची शक्यता आहे. नगरपरिषद निवडणुकीच्या निकालानंतर अधिवेशन होणार असल्याने उत्सुकता होती. मात्र, आता निकाल 21 डिसेंबर पर्यंत लांबणीवर पडला असल्याने आचारसंहितेचे सावट या अधिवेशनावर असणार आहे. आजपासून टी पॉइंट झिरो माई टेकडी रोड आकाशवाणी चौक सिव्हिल लाईन्स परिसरात ठीक ठिकाणी तगडा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
विधान भवन परिसरात कुणालाही पास असल्याशिवाय प्रवेश दिला जात नाही. यावेळी आतापर्यंत 33 मोर्चासाठी परवानगी घेण्यात आली असून 20 सामाजिक संघटनांनी उपोषण तर 16 संघटनांनी धरणे मंडपासाठी परवानगी घेतली आहे. पुणे जमीन घोटाळा आणि इतर मुद्द्यांवर विरोधक आक्रमक होण्याची शक्यता असून आठवडाभर चालणाऱ्या या अधिवेशनात प्रत्यक्षात विदर्भातील किती प्रश्नांना चर्चेत स्थान मिळणार, याची उत्सुकता विदर्भातील जनतेला आहे.
या अधिवेशनानंतर लागलीच जिल्हा परिषद आणि महापालिका निवडणुकीची आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे. एकंदरीत एकजूट नसलेल्या विरोधकांना संख्याबळाच्या आधारावर भक्कम असलेल्या महायुती सरकारशी मुकाबला करावा लागणार आहे.