

Nagpur Winter Session
नागपूर : हिवाळी अधिवेशनाची पूर्वतयारी जोरात सुरू असून विधानमंडळ सचिवालयाचे कामकाज येत्या 28 नोव्हेंबरपासून नागपूर येथे सुरू होत आहे. निवास व कार्यालयीन व्यवस्थेसंदर्भातील सर्व कामे तातडीने पूर्ण होईल, यादृष्टीने नियोजन करावे, अशा सूचना महाराष्ट्र विधानमंडळाचे सचिव डॉ. विलास आठवले यांनी आज (दि.१४) दिल्या. विधानभवन येथे अधिवेशनासंदर्भातील व्यवस्थेचा आढावा घेण्यात आला.
हिवाळी अधिवेशनानिमित्त रविभवन, नागभवन, आमदार निवास आदी ठिकाणी पीठासीन अधिकारी तसेच इतर लोकप्रतिनिधी व वरिष्ठ अधिकाऱ्यांसाठी निवास व्यवस्था करण्यात येते. निवास व्यवस्था लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या दृष्टीने सार्वजनिक बांधकाम विभागाने प्राधान्याने कामे पूर्ण करावी, अशी सूचना करताना मुख्य प्रतोद व प्रतोद यांना मंत्री व राज्यमंत्री पदाचा दर्जा देण्यात आला आहे. त्यामुळे त्यांच्या कार्यालयासाठी व इतर सुविधा उपलब्ध करून देण्यात यावी. आमदार निवास येथे महिला सदस्यांसाठी पहिल्या इमारतीमधील पहिला व दुसरा माळा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. आमदार निवासातील इतर इमारतींमध्ये स्वच्छता, पाणी, विद्युत आदी सुविधा खंडित होणार नाही याची खबरदारी घेण्यात यावी, अशी सूचनाही यावेळी सचिव डॉ. विलास आठवले यांनी केली.
अधिवेशन काळात विधानभवन परिसरात तसेच आमदार निवास व रविभवन येथे सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना करण्यात याव्यात तसेच वाहनांच्या पार्किंगची व्यवस्था सुलभ होईल यासाठी पोलीस विभागातर्फे उपाययोजना करण्यात याव्यात. संपूर्ण परिसरात स्वच्छता, अग्निशमन व्यवस्था तसेच अखंडित वीजपुरवठा राहील यासाठी महानगरपालिका व इतर विभागाने समन्वयाने काम करावे, अशा सूचना बैठकीत देण्यात आल्या. विधिमंडळाचे काही अधिकारी व कर्मचारी येत्या 20 तारखेपासून नागपूर येथे रुजू होत असल्यामुळे त्यांना आवश्यक वाहन व निवासाच्या सुविधा पूर्ण कराव्यात.
अधिवेशनानिमित्त आमदार निवास, विधानभवन, रेल्वे स्टेशन आदी ठिकाणी बसेसची व्यवस्था करण्यात येते. रेल्वेस्टेशनवर वाहतूक व्यवस्थेचे नियोजन करतांना अडचण येणार नाही याची खबरदारी घेण्यात यावी.विधानभवन, रविभवन, आमदार निवास व सुयोग येथे आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यात येतात. आमदार निवास व विधानभवन येथे हिरकणी कक्ष सज्ज ठेवण्यात येणार आहे. मंत्रिमंडळातील सदस्यांसाठी विधानभवन परिसरात कार्यालयीन दालनांची अतिरिक्त व्यवस्था करण्यात आली आहे. विद्युत, दूरध्वनी व्यवस्था तसेच अधिवेशन कालावधीत विधानसभा व विधान परिषद येथे करावयाच्या व्यवस्थेचा यावेळी आढावा घेण्यात आला.
यावेळी विभागीय आयुक्त श्रीमती विजयलक्ष्मी बिदरी, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, अतिरिक्त पोलीस आयुक्त राजेंद्र दाभाडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक महामुनी, महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त बी. वैष्णवी, अतिरिक्त आयुक्त वसुमना पंत तसेच विधानमंडळाचे उपसचिव रवींद्र जगदाळे, विजय कोमटवार, अजय सरवनकर, निलेश वडनेरकर, कक्ष अधिकारी कैलास पाझारे आदी वरिष्ठ अधिकारी तसेच सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते.