

नागपूर - विधिमंडळ अधिवेशन उद्या रविवारी संपणार असताना आज शनिवारी कोळी समाजाचे आंदोलन चिघळल्याने यशवंत स्टेडियम परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. अनुसूचित जमाती (आदिवासी) दर्जाची मागणी आणि जात प्रमाणपत्र व वैधता पडताळणी प्रक्रियेतील कथित अन्यायावर तोडगा काढण्यासाठी कोळी समाजाने शनिवारी अर्ध-नग्न आंदोलन आणि बेमुदत उपोषण सुरू केले.
आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे यांच्यापासून प्रेरित एका समितीच्या बॅनरखाली सुरू झालेले हे आंदोलन नंतर आक्रमक झाले. यशवंत स्टेडियमवर सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान एका व्यक्तीने भिंतीवरून उडी मारत आत्महत्येचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून ही घटना रोखली. घटनास्थळी मोठी खळबळ उडाली. या आंदोलकांचा आरोप आहे की, महादेव कोळी, मल्हार कोळी आणि ढोर कोळी समाजाच्या व्यक्तींचे अर्ज फेटाळले जात आहेत. कारण १९५० पूर्वीच्या शाळा आणि महसूल नोंदींमध्ये केवळ 'कोळी' असाच उल्लेख आहे. या नोंदी त्यावेळच्या प्रचलित कायद्यांनुसार तयार केल्या गेल्या होत्या आणि त्या वैध कागदोपत्री पुरावा म्हणून स्वीकारल्या पाहिजेत. अशा कागदपत्रांना मान्यता देणारा सरकारी ठराव राज्य सरकारने तात्काळ जारी करावा, अशी मागणी आंदोलकांनी केली.
स्पष्ट धोरणाच्या अभावामुळे हजारो कुटुंबांचे शिक्षण, रोजगार आणि आरक्षणाचे हक्क बाधित झाले आहेत, असा दावा करत आंदोलकांनी हा प्रश्न सोडवण्यासाठी सरकारने एकसमान निकष लागू करावेत, असे आवाहन केले. दरम्यान, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेत्या सुषमा अंधारे यांनी आंदोलनस्थळी भेट देत आंदोलकांना शांत करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी पोलीस प्रशासनाला या आंदोलकांना ताब्यात न घेण्याची विनंतीही केली.