

राजेंद्र उट्टलवार
नागपूर : राज्यातील शेतकऱ्याच्या आत्महत्यांचे पाप महायुती सरकारचे आहे, अशी टीका अंतिम आठवड्याच्या प्रस्तावावर चर्चा सुरू करताना काँग्रेसचे गटनेते विजय वडेट्टीवार यांनी शनिवारी (दि.१३) केली.
रविवारी (दि. 14) नागपुरात सुरू असलेल्या विधिमंडळ हिवाळी अधिवेशनाचे सूप वाजणार आहे. 8 डिसेंबरपासून सुरू झालेल्या या अधिवेशनावर नगर पालिका निवडणूक निकाल न आल्याने अनिश्चिततेचे तर आचारसंहितेचे सावट आहे. सत्तापक्ष आणि विरोधकांच्या प्रस्तावावरील चर्चेला उद्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकार उत्तर देणार आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील भ्रष्टाचार आणि विविध गंभीर समस्यांवरून सत्ताधारी पक्षावर वडेट्टीवार, सुनील प्रभू यांनी जोरदार टीका केली. शेतकरी आत्महत्या, कृषी क्षेत्रातील निधीचा अपव्यय, ढासळलेली कायदा आणि सुव्यवस्था, महिला व बालकांवरील वाढते अत्याचार तसेच भ्रष्टाचाराच्या मुद्द्यांवरून विरोधकांनी सरकारवर हल्लाबोल केला.
राज्यात दररोज ८ शेतकरी आत्महत्या करीत आहेत. अतिवृष्टीने राज्यातील २८ जिल्ह्यांना फटका बसला. सरकारने ३१ हजार कोटींच्या पॅकेजची घोषणा केली.पण हे पॅकेज कागदावर राहिले. कोरडवाहू शेतकऱ्यांना प्रती हेक्टर १८,५०० रुपये मदतीचे गाजर दाखवले, पण प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या पदरात फक्त ८,५०० रुपये मिळाले. कृषी विभागाला ६,००० कोटी रुपयांची गरज असताना सरकारने शेतकऱ्यांसाठी केवळ ६१६ कोटी रुपये दिले. चार महिन्यांपूर्वी 'कृषी समृद्धी' योजनेची मोठी घोषणा केली, पण आजपर्यंत या योजनेसाठी एका पैशाची तरतूद केलेली नाही. यामुळे विदर्भात होणाऱ्या अधिवेशनात शेतकऱ्यांच्या पदरात काहीच पडणार नाही.
आर्थिक वर्ष संपायला अडीच महिने उरले असताना कृषीसाठी अर्थसंकल्पीय तरतुदीच्या केवळ ३४ टक्के निधी खर्च झाला आहे. आज शेतकऱ्यांचे पिक गेले, त्यांच्या जमिनी खरवडल्या दुसऱ्या बाजूला बियाणे, खते, कीटकनाशके यांच्या किमती वाढल्या आहेत. सोयाबीन, कापूस, धान शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमीभाव मिळत नाही. काळया मातीशी ईमान ठेवणाऱ्या या बळीराजाची फसवणूक महायुती सरकारने केली आहे. शेतकरी आत्महत्येचे पाप या सरकारचे आहे, अशी टीका यावेळी वडेट्टीवार यांनी केली.
राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था बिघडली आहे.गुन्हेगारीमध्ये वाढ झाली आहे. एनसीआरबीच्या आकडेवारीनुसार, भ्रष्टाचार आणि आर्थिक गैरव्यवहारांमध्ये महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आहे. ज्येष्ठ नागरिकांवरील अत्याचारातही राज्याचा क्रमांक पहिला आहे, तर बाल गुन्हेगारीमध्ये राज्य पाचव्या क्रमांकावर आहे.राज्यात दररोज ८ बलात्काराच्या घटना आणि ५१ अपहरणाच्या घटना घडत आहेत. तीन वर्षांच्या मुलीवर अत्याचार करून तिची हत्या करणे, हा समाजाला कलंक आहे.आज महिलांसाठी सुरक्षित वातावरण नाही.
मुंबईत गेल्या ३६ दिवसांत ८२ मुले बेपत्ता झाली, ज्यात मुलींचे प्रमाण अधिक आहे. जून ते डिसेंबर या काळात ३७० अल्पवयीन मुले बेपत्ता झाली असून त्यापैकी २६८ मुली आहेत. राज्यात पोलिस दलात ३३ हजार २२८ पदे रिक्त आहेत. प्रति एक लाख लोकांमागे केवळ १७२ पोलिस आहेत. पोलिस कर्मचाऱ्यांवर प्रचंड ताण असून त्यांना शासकीय निवासस्थानांसारख्या मूलभूत सुविधांचा अभाव आहे. पुणे, मुंबई आणि नागपूरमध्ये 'एमडी' ड्रग्सचा विळखा वाढत असून तरुण पिढी बरबाद होत आहे. वाशिम, मालेगाव येथे गुटखा रॅकेट सुरू आहे.
मुलींच्या विक्रीचे रॅकेट पालघर, मोखाडा, वाडा भागात सक्रिय असून या मुलींची ४० ते ५० हजार रुपयांना विक्री होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पुणे येथील आदिवासी वसतिगृहात सुट्टीवरून परत आलेल्या मुलींची गर्भधारणा चाचणी केली जात असल्याच्या घटना अत्यंत निषेधार्ह आहेत. या प्रकरणाची SIT चौकशी होऊन संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी केली.
अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलताना काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी पुण्यातील मुंढवा येथील महार वतनाची जमीन आयटी पार्कसाठी आरक्षित नसतानाही, एका कंपनीला कवडीमोल भावाने देण्यात आल्याचा आरोप केला. २००० कोटींची जमीन ३०० कोटीमध्ये विकण्यात आली. ४२ कोटींचे मुद्रांक शुल्क माफ करण्यात आले. ज्या अमेडिया कंपनीने जमीन खरेदी केली त्यातील ९९ टक्के मालकी असलेल्यावर कारवाई का होत नाही? राज्यातील अशा महसूल,गायरान, गावठाण,देवस्थान, शासकीय, वतनाच्या जमिनीची श्वेतपत्रिका काढण्याची मागणी विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी केली.