

Temperature Drop in Vidarbha
नागपूर : मावळत्या वर्षाला निरोप दिल्यानंतर नववर्षातही थंडीचा तडाखा उपराजधानीत कायम आहे. एकीकडे राजधानीत निवडणुकीच्या निमित्ताने राजकीय वातावरण तापले असताना आज (दि.६) तापमानाचा पारा सर्वात कमी किमान 7.6 अंश सेल्सिअसपर्यंत खाली घसरला.
गोंदियात तो 7 अंशावर आला. यामुळे थंडीने या मोसमातील नीचांक गाठला. वर्धा येथे 8.4 अमरावती ब्रह्मपुरी 9.6 अंश याप्रमाणे तापमानाची नोंद झाली याशिवाय विदर्भात इतर जिल्ह्यात तापमान 10 ते 15 अंश सेल्सिअसच्या आसपास होते. एकंदरीत कमी, अधिक प्रमाणात उपराजधानीत मार्च महिन्यापर्यंत शीत लहरींची शक्यता केंद्रीय हवामान खात्याने यापूर्वीच व्यक्त केली आहे.
मध्य भारताचा विचार करता विदर्भात यावर्षी जानेवारी ते मार्च दरम्यान हवामान बदल दिसण्याची शक्यता आहे. विदर्भात जानेवारीत थोड्याफार प्रमाणात पावसाचीही शक्यता आहे. मध्य भारतातील काही भागात, विदर्भात किमान तापमान सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे. सकाळी तसेच रात्री गारठा जाणवू शकतो, त्याचा परिणाम आरोग्य आणि शेतीवर होऊ शकतो. या काळात श्वसन विकार असलेल्या नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन वैद्यकीय तज्ञांनी केले आहे.
दरम्यान ,फेब्रुवारी, मार्च महिन्यात विदर्भामध्ये हवामान परिस्थिती बदलण्याचा अंदाज आहे. या दोन महिन्यात देखील पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली. एकंदरीत जानेवारीत कोरडे, काहीसे थंड हवामान तर फेब्रुवारी मार्चमध्ये पावसात वाढ, असा संमिश्र हवामानाचा अनुभव यावर्षी विदर्भाला येऊ शकतो, असा अंदाज आहे.