

Nagpur Municipal Corporation Election
नागपूर: नागपूर महानगरपालिका निवडणुकीसाठी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचा जाहीरनामा मंगळवारी (दि.६) प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आला. या जाहीरनाम्यात काँग्रेसने भाजप्रमाणेच २४x७ पाणीपुरवठा (महिन्याला ३०,००० लिटरपर्यंत मोफत), ५०० चौ. फु. पर्यंतच्या घरांना मालमत्ता करमाफी, तसेच महिला, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, स्वातंत्र्यसैनिक आणि माजी सैनिकांसाठी मोफत शहर बस सेवा यांसह नागपूरकरांच्या दैनंदिन जीवनाशी थेट संबंधित १७ हून अधिक जनहितकारी योजना जाहीर केल्या आहेत.
या जाहीरनाम्यात नागपूर महानगरपालिकेत गेल्या १९ वर्षांत भाजपच्या अपयशी कारभारामुळे निर्माण झालेल्या समस्यांचा उल्लेख करण्यात आला असून, भाजपचे फसवे स्वप्नरंजन आकडेवारीसह मांडताना, काँग्रेसचे मिशन 100 नगरसेवक यशस्वी होईल, असा विश्वास आणि स्वच्छ, सुरक्षित आणि स्मार्ट नागपूर घडवण्याचा ठाम व निर्धारपूर्ण संकल्प काँग्रेसने व्यक्त केला.
स्थानिक महाकाळकर सभागृहात आयोजित कार्यक्रमात प्रदेशाध्यक्षांच्या हस्ते हा काँग्रेसचा जाहीरनामा मराठी व हिंदी भाषेत प्रकाशित करण्यात आला. यावेळी गटनेते विजय वडेट्टीवार, कुणाल चौधरी, काँग्रेसचे राज्य सहप्रभारी, रंजित कांबळे, काँग्रेसचे शहर निरीक्षक, विकास ठाकरे, अध्यक्ष, नागपूर शहर (जिल्हा) काँग्रेस कमिटी, आमदार अभिजीत वंजारी, अतुल लोंढे, माजी मंत्री अनीस अहमद, माजी आमदार अशोक धवड, निवडणूक प्रमुख दिनेश बनाबकोडे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. या कार्यक्रमात काँग्रेसच्या १५१ उमेदवारांना मार्गदर्शन करण्यात आले.