

Samruddhi Highway Gantry installation work
नागपूर, वर्धा : हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृध्दी महामार्गावर या आठवड्यात हायवे ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम अंतर्गत 9 ते 13 जानेवारीदरम्यान पाच दिवस वाहतूक थांबविली जाणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र राज्य रस्ते विकास मंडळाचे जनसंपर्क अधिकारी तुषार अहिरे यांनी बुधवारी (दि.७) दिली.
हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृध्दी महामार्गावर हायवे ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम अंतर्गत गॅन्ट्री उभारण्याचे काम करण्यात येणार आहे. त्यासाठी महामार्ग 9 ते 13 जानेवारी दरम्यान काही ठिकाणी 45 ते 60 मिनीटांसाठी पुर्णतः थांबविण्यात येणार आहे. महामार्गावरुन प्रवास करणाऱ्या जिल्ह्यातील नागरिकांनी याची नोंद घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
समृध्दी महामार्गावर अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे, चांदूर रेल्वे व नांदगांव खंडेश्वर तालुक्यातील कि.मी. 90+500 ते कि.मी. 150+300 येथे गॅन्ट्री उभारण्याचे काम 10 टप्प्यात करण्यात येणार आहे. प्रत्येक टप्यादरम्यान कामाच्या टप्प्यानजीक संबंधित वाहिनीवरील वाहतूक 45 ते 60 मिनिटांकरिता पूर्णतः थांबविण्यात येणार आहे. काम पूर्ण झाल्यावर संबंधित वाहिनीवरील वाहतूक पुन्हा सुरु करण्यात येईल.
त्यानुसार गॅन्ट्री उभारण्याच्या कामाकरीता 9 जानेवारी रोजी मुंबई वाहिनीवर चांदुर रेल्वे तालुक्यातील मांजरखेड व धोत्रा गावाजवळ दुपारी 3 ते 4 वाजताच्या दरम्यान ब्लॅाक राहील. मांजरखेड जवळ नागपूर वाहिनीवर देखील दुपारी 12 ते 1 वाजताच्या दरम्यान ब्लॅाक राहील. 10 जानेवारी रोजी धामणगाव तालुक्यातील वाढोणा गावाजवळ नागपूर वाहिनीवर दुपारी 3 ते 4, चांदुर रेल्वे तालुक्यातील खंबाळा गावाजवळ मुंबई वाहिनीवर दुपारी 12 ते 1 वाजतादरम्यान ब्लॅाक राहील.
12 जानेवारी रोजी नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील शहापुर खेकडी व पाचोड गावांजवळ नागपूर वाहिनीवर दुपारी 3 ते 4 वाजतादरम्यान ब्लॅाक राहील. 13 जानेवारी रोजी नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील देऊळगाव व शहापूर खेकडी या गावांजवळ मुंबई वाहिनीवर दुपारी 12 ते 1 वाजता तर देऊळगाव जवळ नागपूर वाहिनीवर देखील दुपारी 3 ते 4 वाजताच्या दरम्यान ब्लॅाक राहणार आहे. या दरम्यान मार्ग वाहतुकीकरीता पुर्णतः थांबविण्यात येणार असल्याचे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांनी कळविले आहे.