

Wardha Man Falls Into Well
नागपूर : एखादा माणूस विहिरीत पडला तर किती वेळ तग धरणार ? पण हा दैव बलवत्तर असलेला तरुण तब्बल १८ तास एका विहिरीत मृत्यूशी झुंज देत होता. वर्धा येथे नागपूरच्या एनसीसी जवानांचे प्रशिक्षण शिबिर सुरू होते. यादरम्यान जवानांनी समयसूचकता आणि धाडस दाखविले आणि विहिरीत अडकून पडलेल्याचा जीव वाचला.
३ जुलै रोजी सकाळी साडेअकराच्या सुमारास एका स्थानिक महिलेने उप कॅम्प कमांडर मेजर रिझू रावत यांच्याशी संपर्क साधून शेजारील विहिरीतून मदतीसाठी काही आवाज येत असल्याची माहिती दिली. लागलीच आपल्या शेजारी राहणारी व्यक्ती विहिरीत पडल्याचे तिने सांगितले. माहिती मिळताच मेजर रावत यांनी कॅम्प कमांडर लेफ्टनंट कर्नल प्रीती तिवारी यांना माहिती दिली. एनडीआरएफचे प्रतिनिधी योगायोगाने प्रशिक्षणासाठी शिबिरात उपस्थित होते.
तत्काळ रेस्क्यू ट्युब उपलब्ध झाल्याने विहिरीत अडकलेल्या व्यक्तीपर्यंत सुरक्षितपणे पोहोचणे शक्य झाले. सुभेदार मेजर चंद्रभान सिंग, हवालदार (नर्सिंग असिस्टंट) जंगले जी. बी. नायक (नर्सिंग असिस्टंट) गणेश आणि एमटीएस चालक विशाल यांनी हे बचावकार्य केले. रात्रभर विहिरीत राहूनही आपला जीव वाचल्याचा आनंद त्याच्या चेहऱ्यावर होता. त्यानंतर त्याला एनसीसी शिबिरात नेऊन तातडीने आवश्यक प्रथमोपचार व नंतर वैद्यकीय उपचार देण्यात आले.