

Nagpur Wardha train accident
नागपूर: नागपूरहून मंगळवारी (दि.१७) सकाळी साडेदहा वाजताच्या सुमारास सेवाग्राम वर्धाच्या दिशेने जाणाऱ्या ग्रँड ट्रंक जीटी एक्सप्रेसच्या शेवटच्या दोन डब्यांना आग लागल्याने खळबळ उडाली. सुदैवाने वेळीच हे डबे वेगळे करण्यात यश आल्यामुळे पुढील अनर्थ टळला.
ही घटना वर्धा जिल्ह्यातील सिंदि ते तुळजापूर दरम्यान घडली. गार्ड,पार्सल कोच, दिव्यांग कोच या भीषण आगीने काही वेळातच आपल्या कवेत घेतले. घाबरलेले प्रवासी जिव मुठीत धरून सामानासहित खाली रेल्वे रुळावर उतरले. दिल्ली येथून चेन्नईच्या दिशेने धडधडत निघालेल्या जीटी एक्सप्रेसला सिंधी (रेल्वे) ते तुळजापूरच्या दरम्यान पोल क्रं 784 जवळ ही आग लागली.
बराच वेळ ही बर्निंग ट्रेन, कोच घटनास्थळी असल्याने लोकांची मोठी गर्दी जमली. कसल्यातरी ज्वलनशील पदार्थाने ही आग लागल्याचे प्रत्यक्षदर्शी सांगत होते. हा अपघात की घातपात अशीही चर्चा सुरु होती. सुरुवातीला पार्सल डब्याला आग लागली. रेल्वे सुरक्षा बल घटनास्थळी दाखल झाल्यानंतर आग विझवण्याचे प्रयत्न अधिक वेगाने सुरू झाले. काही वेळात बऱ्यापैकी या आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले.