मणिपूरच्या विद्यार्थ्यांना नागपूर विद्यापीठाचा मदतीचा हात!

मणिपूरच्या विद्यार्थ्यांना नागपूर विद्यापीठाचा मदतीचा हात!

नागपूर; पुढारी वृत्तसेवा : मणिपूरमध्ये उसळलेल्या दंगलीत विद्यापीठाच्या वसतिगृहातील विद्यार्थ्यांचे मूळ प्रमाणपत्र इतर साहित्य सोबत जळून खाक झाल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाण्याचा धोका होता. अशा परिस्थितीमध्ये राज्य व घर सोडून आलेल्या मणिपूर येथील विद्यार्थ्यांना राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने मदतीचा हात पुढे करून त्यांचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण करण्यास मदत केली.

मणिपूर येथील विद्यार्थ्यांना स्नातकोत्तर शिक्षण पूर्ण करण्यासाठी मदतीचा हात पुढे केल्याने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ कुलगुरूंचे राज्य सेवा हक्क आयोगाने अभिनंदन केले आहे. राज्य सेवा हक्क आयुक्त नागपूर महसूल विभाग (मुख्य सचिव दर्जा) अभय यावलकर (भा.प्र.से., से.नि.) यांनी यासंदर्भात अभिनंदन पत्र कुलगुरूंना पाठविले आहे.

अखंडित झालेले शिक्षण पुन्हा सुरू ठेवण्याकरिता राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ आशेचा किरण ठरल्याने मणिपूरच्या विद्यार्थ्यांनी कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी यांचा काही दिवसांपूर्वी सत्कार केला होता, हे विशेष. मणिपूर येथे हिंसाचार सुरू असल्याने अशांतता निर्माण झाली. अशा विस्फोटक परिस्थितीत असंख्य विद्यार्थ्यांना शिक्षण घेणे कठीण झाले होते.

कठीण परिस्थितीचा सामना करत मणिपूर येथील काही विद्यार्थ्यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाची प्रवेश मिळावा म्हणून संपर्क साधला होता. कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी यांनी विद्यार्थ्यांची शैक्षणिक अडचण लक्षात घेता तातडीने मदत करीत विद्यार्थ्यांचे प्रवेश विद्यापीठाच्या विविध विभागांमध्ये करवून घेतले होते. वेळीच मदत केल्याने अशांत असलेल्या मणिपूर येथील विद्यार्थ्यांना राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात त्यांचे शिक्षण सुरू ठेवता आले. विद्यापीठाचा पदव्युत्तर गणित विभाग, पदव्युत्तर इंग्रजी विभाग, पदव्युत्तर मानसशास्त्र विभाग, पदव्युत्तर विधी विभाग आदी विविध विभागांमध्ये मणिपूर येथील विद्यार्थ्यांनी शिक्षण पूर्ण केले आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news