

Umred Mohpa Road Accident Father Daughter Killed
नागपूर : एका भरधाव ट्रकने मोटारसायकलला धडक दिल्याने बाप-लेकीचा जागीच मृत्यू झाला. तर एक मुलगी जखमी झाली. ही घटना उमरेड पोलिस ठाण्याच्या हद्दीतील मोहपा मार्गावरील एमआयडीसी परिसरात घडली.
या घटनेनंतर संतप्त नागरिकांनी चालकाला पकडून मारहाण केली आणि अपघातास कारणीभूत ट्रकला आग लावली. जमावाने ट्रक चालकाला घेऊन जाणारी पोलिसांच्या वाहनावरही जोरदार दगडफेक केली. या घटनेने काही काळ तणाव निर्माण झाल्याने वाहतूक विस्कळीत झाली होती.
सुभाष केशव भिवनकर (वय ५२) व त्यांची मुलगी तन्वी (वय १६) अशी मृतांची नावे आहेत. वंशिका ज्ञानेश्वर नरूले (वय १७, सर्व रा. मोहपा) ही जखमी आहे. सकाळी सुभाष, तन्वी व वंशिका हे तिघे एमएच-३१-एएक्स-७५७८ या क्रमांकाच्या मोटारसायकलने जात असताना हा अपघात घडला. मोहपा मार्गावरील एमआयडीसी परिसरात एमएच-४०-या क्रमांकाच्या या भरधाव ट्रकने मोटारसायकलला धडक दिल्याने (एमएच-४०-बीजी-७७५०) तिघे जखमी झाले.
गंभीर जखमी झाल्याने घटनास्थळीच सुभाष व तन्वीचा मृत्यू झाला. वंशिका जखमी झाली. या घटनेने नागरिक संतापले. त्यांनी ट्रकचालक प्रफुल्ल दशरथ भोयर (वय २७, रा. भुयार, ता. पवनी, जि. भंडारा) याला पकडून मारहाण केली आणि ट्रकला आग लावली. त्यामुळे तणाव निर्माण झाला.
या घटनेची माहिती मिळताच उमरेड पोलिसांचा ताफा तेथे पोहोचला. पोलिसांनी नागरिकांच्या तावडीतून प्रफुल्ल याची सुटका केली. पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार, उपविभागीय पोलिस अधिकारी वृष्टी जैन यांच्यासह पोलिसांचा ताफा घटनेचे गांभीर्य बघता पोहोचला. पोद्दार यांनी नागरिकांची समजूत घातली. प्राणांतिक अपघाताचा गुन्हा दाखल करून ट्रकचालकाला अटक केली.