

नागपूर : नागपूर-भंडारा महामार्गावर महालगावनजीक असलेल्या नागनदीच्या पुलावर एका अज्ञात वाहनाने दुचाकीला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात नणंद- भावजवईचा (मामे-आत्ते बहीण) असलेल्या दोन तरुण महिलांचा मृत्यू झाला. अलिशा अनिकेत मेहर (२६, रा. भुगाव, ता. कामठी) आणि तिची मामे बहीण मोनाली दिनेश्वर घाटोळे (२७, रा. तायगाव खैरी, ता. सौसर) अशी मृतकांची नावे आहेत.
मोनाली यांचा येत्या २६ फेब्रुवारीला विवाह निश्चित झाला होता. लग्नाची खरेदी आणि तयारी सुरू असतानाच काळाने त्यांच्यावर झडप घातल्याने दोन्ही कुटुंबांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. या दोघी दुचाकीने भुगाव येथे हळदी-कुंकवाच्या कार्यक्रमासाठी जात होत्या.
महालगावजवळील नाग नदीच्या पुलावर मागून येणाऱ्या एका भरधाव अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला पाठीमागून भीषण धडक दिली. ही धडक इतकी जोरदार होती की, दोघीही गंभीर जखमी झाल्याने आलिशाचा जागीच मृत्यू झाला तर मोनालीचा नागपूरला दवाखान्यात नेताना वाटेतच मृत्यू झाला. मृतक अलिशा या मूळच्या पिपळा डाक बंगला येथील रहिवासी असून केवळ सात महिन्यांपूर्वीच त्यांचा विवाह झाला होता. घटनेची माहिती मिळताच मौदा पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. धडक देऊन पसार झालेल्या अज्ञात वाहनचालकाचा शोध मौदा पोलीस घेत आहेत.