Nagpur Trekking News | नागपूरच्या ८ साहसविरांकडून हिमालयातील भृगु लेक ट्रेक यशस्वी
Nagpur Youth Trekking Achievements on Bhrigu Lake Trek
नागपूर: हिमालयातील 14 हजार 100 फूट उंचीवर असलेल्या धौलाधर आणि पीर पंजाल पर्वत रांगानी वेढलेल्या व अल्पाईन कुरणांनी सजलेला भृगू लेक ट्रेक नागपूरच्या आठ साहसीविरांनी यशस्वीरित्या पूर्ण केला. समिधा देशपांडे, समर्थ राव देशमुख, सार्थक वाघमारे, ध्रुव बलेचा, देव्यांश खत्री, हृषित जैन, वंश जैन, आर्य जयस्वाल अशी या आठ साहसीविरांची नावे आहेत.
सीएसी-ऑलराउंडरच्या हिमालयन कॅम्प दरम्यान हे साहसवीर या भृगू लेक ट्रेकवर गेले होते. १७ मे ते २७ मे दरम्यान हा ट्रेक आयोजित करण्यात आला. कॅम्प अॅपल फार्मपासून सुरू झालेल्या या ट्रेक दरम्यान या साहसवीरांनी निसर्गांतील नाट्यमय व तितकेच रोमांचक बदल अनुभवले. वाटेत लागलेली दाट पाइन आणि देवदार जंगले, बर्फाच्छादित शिखरांमधून वाट काढत ही मुले निसर्गरम्य अशा गोठलेल्या भृगु लेकवर यशस्वीरित्या पोहोचली. ‘हा ट्रेक केवळ पर्वतांमधून प्रवास करण्याच्या उद्देशाने आयोजित केला नव्हता.
तर स्वतःचा शोध घेण्याचा, बंध निर्माण करण्याचा आणि निसर्गाशी पुन्हा जोडण्याचा प्रवास होता’, असे समिधा देशपांडे म्हणाली. ‘संपूर्ण मोहिमेदरम्यान उत्तम टीमवर्क, शिस्त आणि लवचिकता दाखवल्यामुळे आम्हाला हा साहसी आणि संस्मरणीय प्रवास पूर्ण करता आला’, असे सार्थक वाघमारे म्हणाला. हा ट्रेक पूर्ण करण्याकरिता साहसविरांना शिरीष देशमुख आणि दक्ष खंते या अनुभवी ट्रेकर्सचे मार्गदर्शन लाभले.

