

रत्नागिरी : रत्नागिरी-मिर्या ते नागपूर या महामार्गाच्या सुरू असलेल्या कामाला पावसाने दणका दिला आहे. अर्धवट कामाच्या ठिकाणी चिखलाचे साम्राज्य पसरल्याने त्यावर उपाययोजना करण्याचे आश्वासन संबधित ठेकेदार कंपनीकडून देण्यात आले आहे. हे काम आता पुढील डिसेंबरपर्यंत पूर्ण करण्याची डेडलाईन देण्यात आली आहे. तर कामाच्या अंदाजपत्रकातही 65 कोटीं वाढ झाल्याचे सांगण्यात आले आहे. काम योग्यप्रकारे न झाल्यास आंदोलनचा इशाराही माजी खासदार विनायक राऊत यांनी दिला.
मिर्या-नागपूर या महामार्ग चौपदरीकरणाच्या कामाला गती देण्यात आली आहे. सद्या या महामार्गाच्या कामाच्या ठिकाणी टप्प्यांवर अंत्यत रेंगाळल्याचे दिसून येत आहे. ज्या गतीने काम हाती घेण्यात आले, त्याप्रमाणे ते न होता आता अस्ताव्यस्त स्वरूपाचे राहिले आहे. कोणत्या ठिकाणाच्याया टप्प्यातील काम पूर्ण होताना दिसून येत नाही. कामे पूर्ण करण्यासाठी मार्च 2025 ची मुदत महामार्ग प्रकल्प प्राधिकरणामार्फत देण्यात आली होती. आता या कामाला डिसेंबर उजाडणार असून, एक लेन पूर्ण होईल असे आश्वासन ठेकेदाराने दिले आहे. या महामार्गात काही ठिकाणी बदल करण्यात आले आहेत.
याबाबत माजी खासदार विनायक राऊत यांनी शासकीय विश्रामगृहावर ठेकेदाराचे अधिकारी कुलदीप दिक्षित यांना बोलावून चर्चा केली व त्यांना सूचना केल्या. नागरिकांच्या मागणीप्रमाणे कामे न झाल्यास वेळ पडल्यास आंदोलनाचा इशाराही दिला यावेळी उबाठाच्या उपस्थित कार्यकर्त्यांनी या महामार्गाबाबतच्या कामाच्या असलेल्या तक्रारी व मागण्यांचा पाढा वाचला. खेडशी येथे महामार्गालगत वीज खांब उभारणीचे काम निकृष्ट दर्जाचे झाले असून रहिवाशांना वीजपुरवठयात मोठा व्यत्यय सातत्याने येत आहे. ही समस्या तातडीने मार्गी लावण्याच्या सूचना माजी खासदार राऊत यांनी दिल्या.
नागरिकांच्या समस्यांकडे गांभीर्याने पहा, आम्ही कामांसाठी सहकार्य करतोय, अशा सूचनाही राउत यांनी केल्या.रत्नागिरीतून जाणार्या या महामार्गाचे 4 कि.मीचे काम पेंडिग राहिलेले आहे. पाईपलाईन बदलण्याची कामे प्रलंबित आहेत, त्याठिकाणी काम पूर्ण करण्यासाठी गती देण्यात आली आहे. पण पावसामुळे या कामात व्यत्यय आलेला असल्याची माहिती कंपनीच्यावतीने देण्यात आली. या महामार्गाबाबत रत्नागिरी शहरानजिकच्या अनेक भागातील कामांबाबत नागरिकाच्ंया मनात शंका निर्माण झालेल्या आहेत. त्याबाबतही यावेळी चर्चा करण्यात आली. त्यामध्ये शहरातून मजगाव मार्गावरील चर्मालय रस्ता चौकात अंडरपास होणार की थेट रस्ता अशी विचारणा करण्यात आली. या नाक्यात महामार्गामधूनच थेट रस्ता क्रॉसिंग होणार असल्याचे सांगण्यात आले? ? आहे. साळवीस्टॉप येथे जंक्शनची निर्मिती केली जाणार आहे. कुवारबाव येथे भविष्यात मध्यभागातून उड्डाणपूल निर्मिती लक्षात घेत महामार्गाचे काम केले जाणार असल्याचे सांगण्यात आलेे. या मार्गावर ज्याठिकाणी प्रवाशी निवारा शेड पाडण्यात आल्या आहेत, तेथे तात्पुरत्या निवारा शेड उभारणी करण्याचे आश्वासन ठेकेदार कंपनीच्यावतीने देण्यात आले. यावेळी उबाठाचे शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता कदम, रत्नागिरी तालुकाप्रमुख शेखर घोसाळे, महिला पदाधिकारी उल्का विश्वासराव, माजी जि.प. सदस्या नेहा माने यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.