

नागपूर : जिल्ह्यातील वडोदा, पाचगांव आणि कळमेश्वर पोलीस ठाण्याचे विभाजन करून नवीन तीन पोलीस ठाण्यांना राज्य शासनाने मंजुरी दिली. यासंदर्भातला शासन निर्णय गुरूवारी (दि.१४) जाहीर करण्यात आला. याबाबत पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता.
नागपूर जिल्ह्याचे क्षेत्रफळ मोठे असून वाढत्या शहरीकरणामुळे जिल्ह्यातील लोकसंख्या वाढली आहे. यामुळे नागपूर शहर दिवसेंदिवस औद्योगिक आणि दळवळणाच्या दृष्टीने प्रगतिशील झाले आहे. त्यामुळे गुन्हेगारांवर वचक ठेवून कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी नवीन तीन पोलीस ठाण्यांना मंजुरी देण्यात आली आहे. याबरोबरच या नवीन पोलिस ठाण्यांसाठी विविध संवर्गातील एकूण २१६ नियमित पदे तसेच ३ सफाई कर्मचारी (बाह्ययंत्रणेद्वारे) या पदांना मंजुरी देण्यात आली आहे. या पदनिर्मितीसाठी २४ कोटी २५ लाख आवर्ती आणि ६ कोटी २ लाख रुपये अनावर्ती खर्चाला सुद्धा शासनाने मंजुरी दिली आहे.