

नागपूर : नागपूर महानगरपालिकेच्या अमृत महोत्सवानिमित्त स्वातंत्र्योत्तर काळात झालेल्या युद्धात प्राणांची आहुती देणाऱ्या शूरवीरांची वीरगाथा साकारणारे युद्ध स्मारक उभारण्यात येणार आहे. हे स्मारक टेकडी रोडवरील संरक्षण विभागाच्या जागेवर उभारण्याच्या नागपूर महानगरपालिकेच्या प्रस्तावाला प्रशासकीय मान्यता मिळाली आहे.या युद्ध स्मारकामध्ये सन १९४८ चे भारत- पाकिस्तान युद्ध, सन १९६२ चे चीन युद्ध, सन १९६५ चे पाकिस्तान युद्ध, सन १९७१ चे बांगलादेश युद्ध व १९९९ चे कारगिल युद्धात देशासाठी शौर्य गाजविणाऱ्या व शहीद झालेल्या वीरांची गाथा साकारली जाणार आहे.
तरुणांना तसेच येणाऱ्या पिढीला देशासाठी प्राणाची आहुती दिलेल्या वीरांच्या शौर्याची माहिती व्हावी, त्यांना देशभक्तीची प्रेरणा मिळावी, या हेतूने महानगरपालिका आयुक्त व कार्यकर्त्यांना प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी यासाठी पुढाकार घेतला आहे. या अभिनव अशा युद्ध स्मारकाला संरक्षण विभागाने विनामूल्य भूखंड देण्यास सहमती दर्शविली आहे. नागपूर २०२५ या स्वयंसेवी संस्थेने या युद्ध स्मारकाची डिझाईन करण्याचा प्रस्ताव महानगरपालिकेला दिला आहे. या स्वयंसेवी संस्थेच्या प्रमुख आर्किटेक्ट कुमारी सौम्या पांडे यांनी यासाठी महानगरपालिकेला विनामूल्य सेवा देण्याची तयारी दर्शविली आहे. महानगरपालिका आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी यांनी यासंदर्भात संरक्षण विभागाचे मेजर जनरल एस. के. विद्यार्थी यांच्याशी पत्रव्यवहार केला. त्यानंतर या अभिनव प्रकल्पासाठी महापालिकेला २९ हजार चौरस फूट जागा देण्यास संरक्षण विभागाने सहमती दर्शविली आहे. या संदर्भातील संरक्षण विभागाचे ना हरकत पत्रही महानगरपालिकेला प्राप्त झाले.
या युद्ध स्मारकासाठी नागपूर महानगरपालिकेने १० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यास तयारी दर्शविली आहे. दोन सामंजस्य करार केले जाणार आहे. पहिला करार नागपूर महानगरपालिका व संरक्षण विभागांमध्ये होणार आहे. हा करार जागेच्या संदर्भात राहणार आहे. तसेच दुसरा सामंजस्य करार युद्ध स्मारकचे डिझाईन तयार करणाऱ्या नागपूर २०२५ या स्वयंसेवी संस्थेशी करणार आहे. हे दोन्ही सामंजस्य करार करण्याची प्रक्रिया प्रशासकीय पातळीवर सुरू आहे.