

नागपूर - गेले काही दिवस राज्यभर गाजत असलेल्या बोगस शालार्थ आयडी, शिक्षक व शिक्षकेतर भरती घोटाळ्यात शुक्रवारी तत्कालीन शिक्षण उपसंचालक आणि सध्या छत्रपती संभाजी नगर येथे माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ सचिव असलेल्या वैशाली जामदार यांना देखील विशेष तपास पथकाने औरंगाबाद येथून ताब्यात घेतले. रात्री उशिरापर्यंत त्यांना घेऊन एसआयटी पथक नागपुरात पोहोचणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यांच्याकडून या शिक्षण घोटाळ्यातील तपासात अधिकचा उलगडा होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, गुरुवारी एसआयटीने ताब्यात घेतलेले नागपूर विभागीय शिक्षण मंडळाचे अध्यक्ष व तत्कालीन प्राथमिक शिक्षण अधिकारी चिंतामण वंजारी यांना आज शुक्रवारी न्यायालयाने 27 मे मंगळवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. एकंदरीत कधीकाळी चौकशी समितीची सूत्रे च्याकडे होती तेच या प्रकरणात आरोपी असल्याने आता या घोटाळ्याची व्याप्ती मोठी असल्याचे सिद्ध झाले आहे.
रात्री उशिरापर्यंत त्यांची कसून विचारपुस, चौकशी सुरू होती.आजवर फरार असलेला संगणकीय हेराफेरी करणारा महत्त्वाचा आरोपी लक्ष्मण उपासराव मंघाम तसेच माजी उपसंचालक अनिल पारधी या दोघांना विशेष तपास पथकाने यापूर्वीच अटक केली आहे. नुकतीच विशेष तपास पथक अर्थात एस आय टी ची स्थापना करण्यात आली. त्यानंतर अल्पावधीत या चार मोठे अधिकारी जाळ्यात आले आहेत.
आता आणखी मोठे मासे जाळ्यात येण्याची आणि सखोल चौकशीत महत्त्वाचे धागेदोरे पुढे सापडण्याची शक्यता आहे. बनावट शालार्थ आयडीच्या माध्यमातून पाचशेवर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची नियुक्ती प्रकरणी सायबर तसेच सदर पोलिसांनी विभागीय शिक्षण उपसंचालक उल्हास नरड, शिक्षक पराग पुडके, निलेश मेश्राम, भारत ढवळे, सुरज नाईक, संजय बडोदकर यांना अटक केली. नरड यांच्या चौकशीत संगणकाच्या बाबतीत निष्णात असलेल्या मंघम याचे नाव समोर आले.
बोगस आयडी तयार करण्यासाठी ज्या आयपी ॲड्रेसचा वापर झाला त्यातील सर्वाधिक आयपी हे फरार आरोपी मंघम याचे होते असेही चौकशीत पुढे आले. सायबर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बळीराम सुतार, पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनीष ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली अटक करण्यात आली.