

नागपूर - महाराष्ट्र वस्तू व सेवा कर (एसजीएसटी) विभागाने ३३ कोटी ९५ लाख रुपयांच्या बनावट इनपुट टॅक्स क्रेडिट (आयटीसी) प्रकरणी जरीपटका येथील मेसर्स के.अँड के. ब्रदर्सचे मालक महेश गुरुदास केशवानी (वय ६२) याला आज शनिवारी अटक केली. न्यायालयाने १४ दिवसांची कोठडी सुनावली.
केशवानी यांची ही फर्म १ जुलै २०१७ रोजी एमजीएसटी कायदा २०१७ अंतर्गत नोंदणीकृत आहे. महेश गुरुदास केशवानी याने १४ पुरवठादारांकडून कोणतीही वस्तू किंवा सेवांची प्रत्यक्ष खरेदी-विक्री न करता केवळ बनावट बिलांच्या आधारे ३३.९५ कोटी रुपयांचे बनावट करदात्यांकडून बनावट इनपुट टॅक्स क्रेडिट घेतले. यामुळे केशवानी याने महाराष्ट्र वस्तू व सेवा कर अधिनियम २०१७ चे उल्लंघन केल्याचे उघडकीस आल्यानंतर महाराष्ट्र वस्तू व सेवा कर विभागाने करचोरी करणाऱ्या बोगस बिल ट्रेडिंग विरोधात विशेष तपासणी मोहिमेंतर्गत महेश गुरुदास केशवानी याला अटक केली.
ही कारवाई सहाय्यक राज्य कर आयुक्त रमेश दळवी (तपास अधिकारी) यांच्या नेतृत्वाखाली राज्य कर निरीक्षक आणि कर सहाय्यकांच्या समर्पित पथकाने केली. नागपूर झोनमधील अतिरिक्त राज्य कर आयुक्त तेजराव के. पाचर्णे, राज्य कर सह आयुक्त (नोडल १) डॉ. संजय कंधारे आणि राज्य कर उपायुक्त (तपास २) डॉ. मुकेश एम. राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली प्रक्रिया पार पाडली. ललितकुमार बोपचे, संजय शिंदे, जयंत नागपूरकर, प्रवीण सावके, डॉ. प्रवीण जाधव, राहुल देवकर, श्रुती कुंभारकर, पूनम राणे, सायली वाडकर आणि कर सहाय्यक संदीप वाघमारे यांनी सहकार्य केले.