

Solar arms manufacturing company Drone Surveillance
नागपूर : एकीकडे राज्य विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशनात चार हजारावर पोलिसांची यंत्रणा सज्ज असतानाच नागपूर अमरावती रोडवर कोंढाळी परिसरात असलेल्या सोलर एक्सप्लोसिव्ह या शस्त्र निर्मितीच्या दृष्टीने महत्वाच्या खासगी कंपनीच्या परिसरात अज्ञात ड्रोन दिसल्याने सुरक्षा यंत्रणेची झोप उडाली आहे.
भारतीय सैन्यासाठी शस्त्रास्त्र व स्फोटके तयार करणाऱ्या या कंपनीच्या परिसरावर ड्रोनद्वारे टेहाळणी करण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. नागपूरच नव्हे तर केंद्रीय सुरक्षा यंत्रणांनीही हे प्रकरण गांभीर्याने घेत सर्व शक्यता पडताळण्यात येत आहेत.
९ डिसेंबरच्या रात्री सुमारे ७.१५ वाजताच्या सुमारास सोलर एक्सप्लोसिव्ह कंपनीच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांना आकाशात लुकलुकणारे दिवे दिसले. अंधारामुळे या ड्रोनचा अचूक आकार किंवा उंची स्पष्ट दिसू शकली नाही. मात्र, हा प्रकार संशयास्पद वाटल्याने सुरक्षा कर्मचाऱ्यांनी तात्काळ वरिष्ठ अधिकाऱ्यांना ही माहिती दिली. कोंढाळी पोलिसांनाही तातडीने सतर्क करण्यात आले.
नागपूर जिल्हा ग्रामीणचे पोलिस अधीक्षक हर्ष पोतदार व अन्य वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देत तातडीने चौकशीचे आदेश दिले. हा ड्रोन एखाद्या लग्नसमारंभाचा, खाजगी कार्यक्रमाचा किंवा नकळत भरकटलेला असल्याची शक्यता गृहीत धरून पोलिस पथकांनी परिसरातील गावांमध्ये शोधमोहीम राबवली.
शेजारच्या मलकापूर, शिवा सावंगा आदी गावांमध्ये पोलिसांनी चौकशी केली. ड्रोन उडविण्यासाठी वापरले जाणारे कंट्रोल यंत्र, कॅमेरे किंवा संबंधित व्यक्ती याबाबत माहिती मिळविण्याचा प्रयत्न करण्यात आला. यासोबतच परिसरात कुणी अनोळखी इसम कुठे आला आहे का? याचा मागोवा घेण्यात आला.तीन दिवस पोलिस आणि दहशतवाद विरोधी (एटीएस) पथकाने देखील या भागात सर्चिंग करुन,शोध घेतला. मात्र या ड्रोनबाबत कोणताही ठोस धागा हाती आला नाही.
या प्रकरणाची माहिती दिल्लीतील केंद्रीय गुप्तचर यंत्रणेच्या मुख्यालयालाही देण्यात आली असून, संभाव्य सुरक्षा धोका लक्षात घेऊन सर्व बाजूंनी चौकशी केली जात आहे. दरम्यान, कोंढाळी पोलिसांकडून या प्रकरणी एफआयआर नोंदवण्याची प्रक्रिया सुरू असून, ड्रोन कुठून आले, कोणी उडवले आणि त्यामागचा उद्देश काय होता, याचा शोध घेण्यासाठी सायबर व तांत्रिक मदत घेतली जात असल्याची माहिती आहे.