

BJP Mahavikas Aghadi election challenge
नागपूर: नागपूरसह राज्यातील 29 महानगर पालिकांच्या निवडणुकांचा बिगुल अखेर वाजला आहे. चिन्ह वाटपानंतर बारा दिवसात उमेदवारांना मतदारांपर्यंत पोहोचण्याची कसोटी पार करावी लागणार आहे. नागपूर महापालिकेतील सत्ता टिकवणे भाजप पुढे तर महायुतीला सत्तेपासून रोखणे काँग्रेस आणि महाविकास आघाडी पुढे आव्हान असणार आहे. 15 जानेवारीला मतदान आणि 16 जानेवारीला निकाल लागणार आहे. राज्य निवडणूक आयोगाने आज या बहुप्रतीक्षित निवडणुकांची घोषणा केली.
रविवारी नागपुरात राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचे सूप वाजले. आज ठिकठिकाणी भूमिपूजन, उद्घाटन कार्यक्रमांची धूम पहायला मिळाली. आता निवडणुकांची घोषणा झाल्याने इच्छुकांची कागदपत्र जुळवाजुळव, लगबग सुरू झाली आहे.
राज्य निवडणूक आयोग आयुक्त दिनेश वाघमारे यांनी जाहीर केल्यानुसार उमेदवारी अर्ज 23-30 डिसेंबर 2025 स्वीकारले जातील तर 31 डिसेंबर छाननी आणि उमेदवारी माघार 2 जानेवारी 2026, निवडणूक चिन्ह वाटप उमेदवार अंतिम यादी 3 जानेवारी रोजी जाहीर होईल.
29 मनपापैकी 27 मनपा ची मुदत संपली असून जालना व इचलकरंजी मनपा नवीन आहेत. दरम्यान, राज्यभरातील नगरपरिषद,नगरपंचायत निवडणुकीचा निकाल 21 डिसेंबर रोजी लागणार आहे. यामुळे आदर्श आचारसंहितेचा अंमल 20 डिसेंबरपर्यंत कायम असणार आहे. अनेक ठिकाणी मतदान व्हायचे आहे. मतदार प्रभावित होऊ नये आणि प्रक्रियेतील पारदर्शकता कायम राहावी, यासाठी राज्यातील सर्व २४६ नगरपालिका व ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकीचा निकाल २१ डिसेंबर रोजी एकत्र जाहीर करण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने राज्य निवडणूक आयोगाला दिला आहे. यासोबतच २० डिसेंबरच्या निवडणुकीपर्यंत आचारसंहिता लागू राहील आणि कोणालाही एक्झिट पोल प्रसिद्ध करता येणार नाही, असेही स्पष्ट केले आहे.
राज्य निवडणूक आयोगाने सुरुवातीला ४ नोव्हेंबर रोजी जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार राज्यातील २४६ नगरपालिका व ४२ नगरपंचायतींच्या निवडणुका २ डिसेंबर रोजी होणार होत्या व त्याचा निकाल ३ डिसेंबरला जाहीर केला जाणार होता.