

Smart Meter Issue
नागपूर : काही कार्पोरेट कंपन्याना फायदा होण्यासाठी राज्यात स्मार्ट प्रिपेड मिटर लावण्यात येत आहेत. त्यांचे नुकसान होवू नये म्हणुन विधानसभा निवडणुकीत आश्वासन देवूनही सरकारकडून या स्मार्ट प्रिपेड मिटरची सक्ती करण्यात येत असल्याचा आरोप माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केला आहे. विधानसभा निवडणुकीपुर्वी स्मार्ट प्रिपेड मिटर लावण्याचे काम महावितरणने सुरु केले होते. परंतु नागरीकांचा विरोध लक्षात घेता तत्कालीन उर्जा मंत्री व आताचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्मार्ट प्रिपेड मिटर लावणार नसल्याचे आश्वासन दिले. परंतु आता निवडणुका झाल्यानंतर परत स्मार्ट प्रिपेड मिटर लावण्याचे काम महावितरण कंपनीमार्फत करण्यात येत आहे.
स्मार्ट प्रिपेड मिटरची सक्ती न करता विधानसभा निवडणुकीत दिलेले आश्वासन पाळावे अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केली आहे.
स्मार्ट प्रिपेड मिटरला विरोध असल्याने मुंबईसह राज्यभरात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे वतीने आंदोलन करण्यात आले होते. यानंतर तत्कालीन उर्जा मंत्री व विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत आश्वासन दिले. स्मार्ट प्रिपेड मिटर लावण्यात येणार नाहीत. २०२४ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत प्रचारात जाहीर सभेतही त्यांनी तसे आश्वासन दिले. परंतु सध्या राज्यभरात विरोध असतांना हे स्मार्ट प्रिपेड मिटर लावण्यासाठी सक्ती करण्यात येत आहे. या स्मार्ट प्रिपेड मिटरला विरोध असल्याने ते लावण्यात येवू नये असेही अनिल देशमुख म्हणाले.
महावितरणचा नुकताच वर्धापण दिन मुंबई येथे साजरा झाला. या कार्यक्रमात कंपनीचे अध्यक्ष व व्यस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी मार्च २०२६ पर्यत राज्यात सर्वत्र स्मार्ट प्रि पेड मिटर लावण्याचे टार्गेट पुर्ण करणार असल्याचे वक्तव्य केले. राज्यात यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.