

Shiv Sena UBT Chocolate Andolan
नागपूर : देशातील वाढती महागाई, इंधन दरवाढ, गॅस सिलेंडरचे वाढते दर, शिक्षण क्षेत्रातील पेपरफुटीच्या घटना आणि केंद्र सरकारच्या ‘इव्हेंट’ राजकारणाविरोधात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने नागपुरातील सीताबर्डी येथील व्हेरायटी चौकात शुक्रवारी आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलनकर्त्यांनी जनतेमध्ये ‘मेलोडी चॉकलेट’ वाटप करत केंद्र सरकारच्या धोरणांचा उपरोधिक पद्धतीने निषेध नोंदवला.
शिवसैनिकांनी डोक्यावर आणि हातावर काळ्या पट्ट्या बांधून निषेध व्यक्त केला. “जनता त्रस्त, मोदी मस्त” तसेच “मेलोडी खाओ, खुद जान जाओ” अशा घोषणा देत परिसर दणाणून सोडला.
हे आंदोलन संपर्क प्रमुख सतीश हरडे यांच्या मार्गदर्शनाखाली महानगर प्रमुख किशोर कुमेरिया, शहर प्रमुख संदीप रियाल पटेल, विक्रम राठोड आणि हरिभाऊ बनाईत यांच्या नेतृत्वात पार पडले.
आंदोलनादरम्यान शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी वाढती महागाई, पेट्रोल-डिझेलचे दर, गॅस सिलेंडरची किंमत आणि खाद्यतेलाच्या वाढत्या भावांमुळे सर्वसामान्य नागरिकांचे जीवन कठीण झाल्याचा आरोप केला. “चहापासून दैनंदिन गरजेच्या वस्तूंपर्यंत सर्वच वस्तू महाग झाल्या असून त्याचा सामान्य नागरिकांच्या जीवनावर गंभीर परिणाम होत आहे,” असे आंदोलकांनी सांगितले.
यावेळी सोशल मीडियावरील चर्चांवरूनही सत्ताधाऱ्यांवर टीका करण्यात आली. बेरोजगारीच्या प्रश्नावरून तरुणांमध्ये नाराजी वाढत असल्याचा दावा करत आंदोलकांनी “कॉक्रोच जनता पार्टी” या सोशल मीडिया मोहिमेचाही उल्लेख केला. “तरुणांचा संयम सुटत असून भविष्यात युवक रस्त्यावर उतरून सरकारला धडा शिकवतील,” असा इशाराही आंदोलनकर्त्यांनी दिला.
तसेच पंतप्रधानांच्या परदेश दौऱ्यांवर आणि केंद्र सरकारच्या धोरणांवर टीका करत, “देशाला विश्वगुरूचे स्वप्न दाखवले जात आहे; मात्र प्रत्यक्षात प्रत्येक प्रश्नाचे ‘इव्हेंट’मध्ये रूपांतर केले जात आहे,” असा आरोप करण्यात आला.
या आंदोलनात नितीन सोळंके, गुलाब भोयर, निखिल जाडुलकर, महेंद्र कठाने, दिलीप तुपकर, विकास देशमुख, पंकज साळवीकर, भूषण वेझारी, प्रशांत हळवी, बॉबी गजभिये, राजेश मडकर, सचिन कापसे, निलेश वाडेकर, अरविंद राजपूत, समीर कपाटे, प्रदीप तुपकर, राम कुकडे, अजय राऊत, आनंद हिवरकर, रुपी बावणे, किशोर थोटे यांच्यासह शेकडो शिवसैनिक सहभागी झाले होते.