

Chandrashekhar Bawankule on Vijay Wadettiwar
नागपूर: केवळ माध्यमांसमोर वक्तव्य करून काही होणार नाही. जर खरोखर चौकशी हवी असेल, तर मुख्यमंत्र्यांकडे किंवा संबंधित यंत्रणेकडे पुरावे द्यावेत, कारवाई होईल या शब्दांत महसूल विभागातील कथित भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी कॉंग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांना खुले आव्हान दिले.
महसूल मंत्री बावनकुळे म्हणाले की, विजय वडेट्टीवार यांच्यासह विरोधी पक्षातील नेत्यांनी प्रसार माध्यमांसमोर वक्तव्य करून काही होणार नाही. जर खरोखर चौकशी हवी असेल, तर मुख्यमंत्र्यांकडे किंवा संबंधित यंत्रणेकडे भ्रष्टाचाराचे पुरावे द्यावेत. कोणताही अधिकारी दोषी आढळल्यास त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
बावनकुळे म्हणाले की, केवळ प्रसिद्धीसाठी संवेदनशील प्रकरणांवर वक्तव्य करणे योग्य नाही. अशा बोलण्यामुळे चौकशी यंत्रणांवर दबाव येऊ शकतो, याचीही काळजी घ्यावी. “कोणत्याही अधिकाऱ्याच्या कुटुंबाबद्दल बोलणे चुकीचे आहे. गोपनीय माहिती असल्यास ती सरकारकडे द्यावी, असे त्यांनी सांगितले.
अतिसंवेदनशील खरात प्रकरणाबाबत अधिक बोलण्यास त्यांनी नकार देत, “हे अतिसंवेदनशील प्रकरण आहे. चौकशी यंत्रणा आपले काम करत आहे. तपासात अडथळा येऊ शकतो,” असे म्हटले.
दरम्यान, मोहित कंबोज यांच्यासोबतच्या भेटीवर बोलताना बावनकुळे म्हणाले की, सामाजिक व पारिवारिक कार्यक्रमांना सर्वजण जातात. “अदानी-अंबानी यांच्याकडेही जातो, तसेच छोट्या कार्यकर्त्यांकडे गेलो तर त्यात गैर काही नाही.
विजय वडेट्टीवार यांच्या महिला संदर्भातील वक्तव्यावर टीका करत, कोणाच्याही कुटुंबात संशय निर्माण करणारे वक्तव्य करणे अयोग्य आहे. माहिती असल्यास ती सरकारकडे द्यावी, असे त्यांनी सांगितले. बॉक्स..
खताच्या किमती वाढणार असल्याच्या अफवा फेटाळत बावनकुळे म्हणाले, सोशल मीडियावर चुकीची माहिती पसरवली जात आहे. साठेबाजी करणाऱ्या दुकानदारांवर सरकार कडक कारवाई करेल. शेतकऱ्यांना कोणताही फटका बसू देणार नाही.”
महसूल विभागातील सुधारणांबाबत बोलताना त्यांनी सांगितले की, 1500 चौरस फूटांपर्यंतच्या घरांना कायदेशीर करण्याचा निर्णय घेतला आहे. पुढील तीन वर्षांत नागरिकांना तहसील कार्यालयात जाण्याची गरज भासणार नाही, अशा सुविधा उभारण्यात येत आहेत.
मुंबईतील 500 फूट घरांवरील करमाफी प्रस्तावावर लवकर निर्णय होईल.एकूणच, महसूल विभागातील पारदर्शकता वाढविण्यासाठी सरकार कटिबद्ध असून, कोणत्याही प्रकारच्या गैरप्रकारांना थारा दिला जाणार नाही.
नवी मुंबईतील डान्स बार प्रकरण मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणणार आहे. एमआयएम व काँग्रेस वादावर एमआयएम स्वतःची वोट बँक वाढवण्याचा प्रयत्न करत असल्याचे बावनकुळे म्हणाले.