Nagpur kidnapping case : अपहरण झालेल्या ५ वर्षाच्या मुलीची पोलिसांकडून सुटका; कुख्यात आरोपीला अटक
नागपूर : पाच वर्षाच्या मुलीचे अपहरण केलेल्या कुख्यात आरोपीला पोलिसांनी शिताफीने अटक करत चिमुकलीची सुखरूप सुटका केली. ही कारवाई रविवारी (दि.४) बुट्टीबोरी परिसरात करण्यात आली. सूर्या उर्फ मिलिंद बघेल (वय २९, रा. बुटीबोरी) असे या कुख्यात आरोपीचे नाव आहे.
एक अज्ञात व्यक्तीने ५ वर्षाच्या मुलीचे वर्धा रोडवरून अपहरण केले असून तिला सोडविण्यासाठी २० हजाराची खंडणी मागण्यात आल्याची तक्रार मुलीच्या आईने हिंगाणा पोलिस ठाण्यात दिली होती. तसेच त्या आरोपीने ही रक्कम बुट्टीबोरी येथे घेऊन येण्यास सांगितले असल्याचेही या महिलेने पोलिसांना सांगितले. त्यानुसार पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत सापळा रचून सूर्या उर्फ मिलिंद बघेल याला बुट्टीबोरी येथून शिताफीने अटक केली. त्यानंतर चिमुकलीला ताब्यात घेऊन पोलिसांनी तिला आईच्या ताब्यात देण्यात आले. सूर्या याच्यावर खुनाचे गुन्हे दाखल असून त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे. आरोपीला बेलतरोडी पोलीस पथकाने पुढील कारवाईसाठी ताब्यात घेतले आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक मुकुंद कवाडे, उपनिरीक्षक श्रीकांत गोरडे, नारायण घोडके, मनोज गबने तसेच पोलीस अंमलदार विवेक श्रीपाद, सचिन देव्हारे, अतुल माने, अंकुश चौधरी आदींनी केली.

