

Godi police arrest notorious accused
शहागड : पुढारी वृत्तसेवा
अबंड तालुक्यातील करंजाळा येथे 21 मार्च रोजी रात्री परमेश्वर बाबुराव शिंदे यांच्या घराच्या मागील दरवाजाचे कुलूप तोडून कपाटातून रोख रक्कम, सोन्याचे दागिने असा 7 लाख 52 हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास झाला होता. या प्रकरणी गोंदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. गोंदी पोलिसांनी या गुन्ह्यातील दरोडा टाकणाऱ्या आरोपीला लातूर येथून अटक केली.
करंजळा दरोडा प्रकरणात गुन्हा दाखल होताच पोलिसांनी घटनेच्या तपासाची चक्रे फिरवली. तेंव्हा तिर्थपुरी ता.घनसावंगी येथील रहिवाशी बाळू उर्फ बालूसिंह अमरसिंग टाक याची खात्रीलायक माहिती मिळाली. तेंव्हा गोंदी पोलिसांनी पथक तयार केले. 29 एप्रिल रोजी लातूर येथून त्याला अटक केली.
मा. अंबड न्यायालयात या आरोपीला हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्याला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. पोलिसांनी चौकशी केली असता त्याने आपला गुन्हा कबूल केला. दरोडा प्रकरणातील 90 हजार रुपये त्यांच्याकडून जप्त करण्यात आले आहेत.
या आरोपीविरुद्ध 2022 मध्ये विवेकानंद चौक लातूर पोलीस ठाण्यात दरोड्याच्या प्रकरणात गुन्हा दाखल असून, आरोपीची चौकशी केल्यानंतर गोंदी पोलीस ठाणे हद्दीतील तसेच अंबड येथेही चोरी केल्याची कबुली दिलेली आहे. या गुन्ह्याचा तपास चालू आहे.
कुख्यात गुन्हेगाराला अटक करण्याची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल, अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नेपाणी, उपविभागीय पोलिस अधिकारी विशाल खांबे यांच्या मार्गदर्शनाखाली गोंदी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष खांडेकर, पोलीस उपनिरीक्षक किरण हवाले, उपनिरीक्षक बलभीम राऊत, जमादार आशोक नागरगोजे, बामणवात, पोलिस पथकातील पो.का. दीपक भोजने, शाकेर सिद्दीकी, विजय काळे, प्रदीप हवाळे, नितीन खराद, चालक गणेश मुंडे, महिला पोलिस आशा माहुरे यांनी केली.