

नागपूर, पुढारी वृत्तसेवा : जिल्हा पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांच्या निवासस्थानी कार्यरत असलेल्या पोलीस जवानाने आपल्या सर्व्हिस रिवॉल्व्हरमधून स्वतःवर गोळी झाडून घेतल्याने आज (दि.१८) पोलीस दलात खळबळ उडाली. विशाल तुमसरे असे या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. शेअर बाजारात फटका बसल्याने त्याने हे टोकाचे पाऊल उचलल्याची प्राथमिक माहिती आहे. (Nagpur police news)
वर्धा रोडवर जामठा परिसरातील वृंदावन सिटी येथे जिल्हा पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार यांचे निवासस्थानी शनिवारी सकाळी ही घटना घडली. गंभीर अवस्थेत स्वतः पोलीस अधीक्षक पोद्दार यांनीच या पोलिस कर्मचाऱ्याला तातडीने एम्स रुग्णालयात दाखल केले. अतिदक्षता कक्षात त्याच्यावर पुढील उपचार केले जात असून प्रकृती तूर्त गंभीरच असल्याची माहिती सूत्रांनी दिली. या घटनेबाबत आर्थिक की आणखी काही वेगळे कारण असू शकते, यासंदर्भात पुढील तपास पोलीस करत आहेत.