

Nagpur Gambling Den Raid
नागपूर : नागपूर शहर गुन्हे शाखेच्या युनिट-५ ने वाठोडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका जुगार अड्ड्यावर धडक कारवाई करत नऊ जुगाऱ्यांना रंगेहात पकडले. या कारवाईत रोख रक्कम, चारचाकी, दुचाकी, मोबाईल फोन आणि ताशपत्ते असा एकूण २२ लाख ३७ हजार ४५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या कारवाईनंतर इतक्या मोठ्या प्रमाणात सुरू असलेला हा जुगार अड्डा नेमका कुणाच्या संरक्षणाखाली सुरू होता या बाबत परिसरात उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे.
अवैध धंद्यांविरोधातील मोहिमेअंतर्गत नागपूर शहर गुन्हे शाखेच्या युनिट-५ ला वाठोडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोठ्या प्रमाणावर जुगार सुरू असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. या माहितीची खातरजमा करून पोलिसांनी संबंधित ठिकाणी नियोजनबद्ध छापा टाकला. छाप्यावेळी आरोपी स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी पैशांची हारजित लावत ताशपत्त्यांच्या माध्यमातून जुगार खेळताना रंगेहात आढळून आले.
पोलिसांनी दोन पंचांच्या उपस्थितीत पंचनामा करून आरोपींकडून ३२ हजार ४५ रुपये रोख रक्कम, एक होंडा सिटी कार, एक महिंद्रा बोलेरो, पाच दुचाकी वाहने, विविध कंपन्यांचे नऊ अँड्रॉइड मोबाईल आणि जुगारासाठी वापरण्यात येणारे ताशपत्ते जप्त केले. जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालाची एकूण किंमत २२ लाख ३७ हजार ४५ रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.
या प्रकरणी निलेश राजेंद्र चव्हाण, अंकुश सुरेश खडकी, प्रभाकर लक्ष्मण भगत, अमित किशोर खोब्रागडे, शुभम बिसनलाल मस्करे, स्वप्निल दादू बिसेन, विजय केशवराव पाटील, भगवान पतुजी धोटे आणि स्वप्निल राजेंद्र मेश्राम या नऊ जणांविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्यान्वये कलम १२(अ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कारवाईनंतर आरोपींसह जप्त करण्यात आलेला सर्व मुद्देमाल पुढील तपासासाठी वाठोडा पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आला आहे. या धडक कारवाईमुळे शहरातील बेकायदेशीर जुगार अड्डे चालविणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली असून, एवढ्या मोठ्या प्रमाणात सुरू असलेला हा जुगार अड्डा नेमका कुणाच्या आशीर्वादाने चालत होता असा प्रश्न विचारला जात आहे.