

नागपूर : बहिणीचा संसार मोडला, तिचे वैवाहिक आयुष्य उद्ध्वस्त झाले… याचाच राग मनात धरून भावाने साथीदारांच्या मदतीने मेहुण्याचा काटा काढल्याची धक्कादायक बाब मेडिकल चौकातील हत्याकांडाच्या तपासातून समोर आली आहे. भररस्त्यात बेदम मारहाण करून पलाश वासनिक याची निर्घृण हत्या करण्यात आली होती. या थरारक हत्याकांडाचा अजनी पोलिसांनी पर्दाफाश केला असून, मुख्य आरोपीसह तिघांना अटक करण्यात आली आहे.
मृत पलाश वासनिक याच्या हत्येप्रकरणी आयुष ऊर्फ चिंटू धुपे (वय २३), अथर्व दिनेश भगत (वय २०) आणि सुमेध शैलेश मेश्राम (वय २६) या तिघांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. न्यायालयाने आरोपींना १५ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
लग्नानंतरच सुरू झाला कौटुंबिक संघर्ष
मृत पलाश वासनिक याची बहीण परिणीता सजल पाटील (वय २७, रा. भोयर गल्ली, वकीलपेठ, इमामवाडा) हिने पोलिसांत दिलेल्या तक्रारीतून या हत्याकांडामागील कौटुंबिक वादाची पार्श्वभूमी उघड झाली आहे. पलाश ऊर्फ गणी प्रकाश वासनिक (वय ३०) याचा पहिला विवाह २०२० मध्ये आरोपी आयुष धुपे याच्या बहिणीसोबत झाला होता.
मात्र, विवाहानंतर पती-पत्नीमध्ये वारंवार वाद होऊ लागले. वर्षभरातच पलाश कारागृहात गेल्यानंतर त्याच्या पत्नीने घर सोडले. त्यानंतर ती स्वतंत्र राहू लागली. या घटनांमुळे दोन्ही कुटुंबांतील संबंध अधिकच ताणले गेले. बहिणीचे वैवाहिक आयुष्य उद्ध्वस्त झाल्याची भावना आयुषच्या मनात घर करून होती. याच रागातून त्याने पलाशला संपविण्याचा कट रचल्याचा पोलिसांचा संशय आहे.
मेडिकल चौकात भररस्त्यात रक्तरंजित थरार!
गुरुवारी रात्री मेडिकल चौकाजवळ पलाश वासनिक याच्यावर आरोपींनी हल्ला चढविला. रस्त्यावरच त्याला अत्यंत क्रूरपणे मारहाण करण्यात आली. या घटनेमुळे परिसरात नागरिकांची मोठी गर्दी जमली होती. नागरिकांच्या डोळ्यांदेखत आरोपींनी पलाशला बेदम मारहाण केली आणि त्यानंतर घटनास्थळावरून पळ काढला. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या पलाशचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच अजनी पोलिसांनी मध्यरात्रीच्या सुमारास गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात केली.
विशेष पथकाच्या तपासाला यश
हत्याकांडाचे गांभीर्य लक्षात घेऊन अजनी पोलिसांसह परिमंडळ क्रमांक चारच्या विशेष पथकाने समांतर तपास सुरू केला. पोलीस उपनिरीक्षक अतुल टिकले यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे आरोपींचा शोध घेण्यात आला. अखेर इमामवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील करबला धोबीघाट परिसरातून तिन्ही आरोपींना ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आले.
गेल्या काही महिन्यांत शहरात घडलेल्या हत्याकांडांमध्ये पलाशची हत्या अत्यंत क्रूर आणि विदारक स्वरूपाची असल्याचे समोर आले आहे. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी मध्यरात्री घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. त्यांनी तपासाची माहिती घेत संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या. कौटुंबिक वादातून निर्माण झालेली सूडभावना, त्यातून आखलेला हल्ल्याचा कट आणि भररस्त्यात झालेली हत्या यामुळे नागपुरात खळबळ उडाली आहे. या हत्याकांडामागील नेमका घटनाक्रम, आरोपींची भूमिका आणि इतर संभाव्य बाबींचा तपास आता पोलिसांकडून सुरू आहे.