

Nagpur OBC Mahasangh hunger strike
नागपूर: ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही. ओबीसी आरक्षणात इतर वाटेकरी होणार नाहीत, अशी स्पष्ट ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्यानंतरही मुंबईत मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर नागपुरात ओबीसी समाज पुन्हा एकदा आक्रमक झाला आहे. आज (दि.30) पासून नागपुरातील संविधान चौकात राष्ट्रीय ओबीसी महासंघाने साखळी उपोषण सुरू केले आहे. यापूर्वीही याच चौकात आंदोलन झाले होते.
विशेष म्हणजे काँग्रेस खासदार, आमदारांसोबतच भाजपचे सत्तारूढ आमदार डॉ. आशिष देशमुख, परिणय फुके पिवळी टोपी, दुपट्टा घालून या आंदोलनात सहभागी झाल्याने दोन्ही आंदोलनाला राजकीय स्वरूप आले आहे. काँग्रेसचे खासदार नामदेव किरसान, आमदार अभिजित वंजारी, सुधाकर अडबाले, माजी आमदार सुधाकर कोहळे, सेवक वाघाये, अशोक धवड, उज्वला बोढारे, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट शहराध्यक्ष दुनेश्वर पेठे, ओबीसी महासंघाचे सचिन राजूरकर, महासचिव शरद वानखडे, परमेश्वर राऊत प्राध्यापक शेषराव येलेकर आदी प्रामुख्याने सहभागी झाले.
राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे यांनी देशव्यापी हिंदू, मुस्लिम, शीख, इसाई अशा विविध चार हजारांवर जाती ओबीसी समाजात मोडतात. यामुळे विदर्भातील दोन-तीन आमदार सोडले. तर इतर सर्व आमदार ओबीसी महासंघासोबत आहेत. भाजपचे आमदार परिणय फुके, आशिष देशमुख हे राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या आंदोलनात सातत्याने सहभागी होत आहेत. आज उपोषण मंडपात येऊन उघडपणे पाठिंबा दिला आहे.
43 वर्षे संघर्षानंतर मंडल आयोगातून ओबीसींना न्याय मिळाला. सरकारने ओबीसी आरक्षणाला धक्का लावणार नाही, अशी ग्वाही दिली असली तरी मराठा समाजाच्या दडपणात काही चुकीचा निर्णय झालाच तर आम्हीही गप्प बसणार नाही, थेट मुंबईला येऊ असे स्पष्ट केले.
दरम्यान, भाजपचे आमदार डॉ आशिष देशमुख यांनी मराठा समाजाला ओबीसी आरक्षणातून आरक्षण दिले. तर दोन्ही समाजाला न्याय मिळणार नाही, याकडे लक्ष वेधले. आमचा कुणाचाही मराठा समाजाला आरक्षण विरोध नाही. मात्र, स्थानिक स्वराज संस्था निवडणुकीवर डोळा ठेऊन हे आंदोलन सुरू झाल्याची शंका येते. एकंदरीत विरोधकांनी मराठा समाजाला पाठबळ दिल्याचा विरोधकांचा आरोप एकीकडे दुसरीकडे विदर्भातील सत्तारूढ आणि विरोधक ओबीसी समाजाच्या पाठीशी असे चित्र बघायला मिळत आहे.