

nagpur ngo director molestation case
नागपूर : नाशिक पाठोपाठ नागपुरात धार्मिक कारणांवरून युवतींचा मानसिक, शारीरिक छळ, विनयभंग, लैंगिक शोषणाचा, धर्मांतराचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी एकास अटक करण्यात आली आहे.
युनिव्हर्सल मल्टिपर्पज सोसायटीमार्फत झोपडपट्टी भागातील लहान मुलांच्या शिक्षणासाठी काम करणाऱ्या फिकर फाऊंडेशन नावाच्या एका एनजीओ कार्यालयातील हा सर्व गैरप्रकार असून कार्यालयास कुलूप ठोकत रियाज काझी नावाच्या चालकास अटक करण्यात आली आहे. आता यापूर्वी कुणी नोकरी सोडली का, आर्थिक मदत कुठून येत होती अशा बऱ्याच धक्कादायक बाबींचा उलगडा पोलिस तपासात होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
मानकापूर पोलिसात दोन वर्षांपूर्वीचे विनयभंग तक्रारीचे हे प्रकरण असून चार मुलींकडून यासंदर्भात महिला पोलिसांच्या मदतीने त्यांची आपबिती रेकॉर्ड करण्यात आली असून सदर स्वयंसेवी संस्थेच्या चालकाला अटक करून न्यायालयासमोर हजर केले असता 23 एप्रिल पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
हिंदू धर्मीय मुलींना खुदा हाफीज..म्हणत आपलाच धर्म कसा श्रेष्ठ आहे हे पटवून दिले जात होते. मुलींना रोजा,नमाज पठण करण्यासाठी या एनजीओ चालकाकडून दबाव टाकला जात होता. न ऐकल्यास त्यांचा शारीरिक, मानसिक छळ केला जात होता. फिकर फाउंडेशन आणि पढे हम, पढाये हम अशा दोन स्वयंसेवी संस्थांचा कारभार येथून रियाज काझी मार्फत चालविला जात होता.
याच ठिकाणी या युवती कार्यरत होत्या. जुलै 2024 मध्ये अशाच प्रकारे एका युवतीचा छळ झाल्याने तिने नोकरी सोडली. यानंतरही हा प्रकार नव्या मुलींच्या बाबतीत सुरूच होता. न ऐकल्यास त्यांचे आणि त्यांच्या कुटुंबीयांचे बरेवाईट करण्याची धमकी देखील दिली गेली. काही दिवसापूर्वीच या सर्व युवतींनी हिंमत दाखवित मानकापूर पोलिस स्टेशन गाठून तक्रार दिली. भोंदूबाबा अशोक खरात, नाशिकचे कार्पोरेट ऑफिसमधील प्रकरण आणि अमरावती जिल्ह्यातील घटना पाहता पोलिसांनी तातडीने या संस्था चालकास अटक केली. आता त्याच्या सोबत आणखी कुणी आहेत का याचा पोलिस मागोवा घेत आहेत.
दरम्यान, पोलिसांनी तत्परतेने योग्यवेळी एक गंभीर प्रकरण उघडकीस आणले. तातडीने एनजीओ चालकास अटक करीत कठोर कारवाई केली. नागपुरात भविष्यातील गंभीर प्रकरण रोखले गेल्याची प्रतिक्रिया महसूलमंत्री, जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केली. राज्य अल्पसंख्यांक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांनीही याविषयीची माहिती नाल्याचे सांगत कठोर कारवाईची ग्वाही दिली.