

नागपूर : एमडी ड्रग्सचे व्यसन लावून पतीच्या दोन मित्रांनी २२ वर्षीय विवाहितेवर वारंवार बलात्कार केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. खापरखेडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली असून याप्रकरणी पोलिसांनी दोघांविरुद्ध बलात्कारासह विविध कलमांन्वये गुन्हा दाखल केला. आशिय शास्त्री आणि अनुराग' कटारिया, अशी या नराधमांची नावे आहेत.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आशिष व अनुराग पीडितेच्या पतीचे मित्र आहेत. पीडितेचे २०२३ मध्ये बांधकाम कंपनीत काम करणाऱ्या तरुणासोबत लग्न झाले. पतीचे मित्र असल्याने आशिष व अनुरागची तिच्यासोबत ओळख झाली. दीड वर्षांपूर्वी दोघांनी तिला एमडीचे व्यसन लावले. ती एमडीच्या आहारी गेली. एमडीसाठी ती वाट्टेल ते करायला लागली. हीच संधी साधून दोघांनी एमडी देण्याच्या बहाण्याने विविध ठिकाणी तिच्यावर अत्याचार केला.
काही दिवसांपासून पत्नीच्या बदललेल्या वागणुकीमुळे पतीला संशय आला होता. संशयाचे निरसन करण्यासाठी त्याने पत्नीवर आणि त्याच्या दोन्ही मित्रांवर गुप्तपणे पाळत ठेवली. यावेळी त्याचेच मित्र त्याच्या पत्नीला अमली पदार्थांचे आमिष दाखवून तिचे शारीरिक शोषण करत असल्याचे पतीच्या निदर्शनास आले. हा धक्कादायक प्रकार समोर आल्यानंतर पतीने तात्काळ पत्नीला विश्वासात घेतले. त्यानंतर पीडित महिलेने पतीसोबत खापरखेडा पोलीस ठाणे गाठून आरोपींविरुद्ध रीतसर तक्रार दाखल केली. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तातडीने गुन्हा नोंदवला असून, आरोपींच्या अटकेसाठी पुढील कायदेशीर कारवाई सुरू केली आहे. या घटनेमुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त होत आहे.