

Nagpur Murder Case
नागपूर : दिवसाढवळ्या एका महिलेच्या हत्येने बुधवारी (दि.२३) उपराजधानी हादरली. सीताबर्डी पोलीस स्टेशनच्या अंतर्गत जवाहरलाल नगरातील इंदिरा कॉन्व्हेन्ट परिसरात ही घटना घडली. मायाबाई मदन पेसरकर (वय 50) असे या मृत महिलेचे नाव आहे. जावयाने पाच लाख रुपयांसाठी सासूची हत्या केल्याचे पोलिस तपासात उघड झाले असून हा संपूर्ण घटनाक्रम परिसरातील सीसीटीव्हीत कैद झाला आहे.
हा व्हिडिओ व्हायरल होताच पोलिस तपासाला गती आली. आरोपी जावयाचे नाव मुस्तफा खान मोहम्मद खान असे असून त्याच्याकडून मृत मायाबाईने पाच लाख रुपये उधार घेतले होते. मात्र, बरेच दिवस होऊनही ते पैसे परत न मिळाल्याने या दोघांमध्ये वारंवार वादावादी होत होती. बुधवारी देखील असाच या पैशासाठी वाद होऊन तो विकोपाला गेला. त्याने बाजारातून चाकू विकत घेतला आणि तो संधीच्या शोधात होता.
दरम्यान, मायाबाई कामावरून घरी परत येत असताना त्याने त्यांना गाठले. गळा दाबला आणि चाकूने सपासप वार करीत मायाबाईची गळा कापून हत्या केली. सीताबर्डी पोलीस, क्राईम ब्रँच, श्वान पथक तातडीने घटनास्थळी पोहोचले. मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयाकडे रवाना करण्यात आला. पोलिसांनी मुस्तफा खान मोहम्मद खानला ताब्यात घेतले आणि चौकशी केली असता त्याने या हत्येची कबुली दिली.