

नागपूर : काँग्रेस नेते राहुल गांधी यांची लढाई ही त्यांच्या स्वतःच्या अस्तित्वाची लढाई आहे. त्यांना वारंवार निवडणुकात पराभव पत्करावा लागत आहे. काँग्रेस पक्षातही मोठ्या प्रमाणावर अशी भावना निर्माण होत आहे की राहुल गांधी विजय मिळवून देऊ शकत नाहीत. त्यामुळे त्यांना हटवावे, अशी मागणी होत आहे. या पार्श्वभूमीवर पक्षातील अंतर्गत वातावरण विचलित करण्यासाठी ते उलटसुलट अशा प्रकारची वक्तव्ये करत आहेत असा आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना केला.
मराठा आरक्षण, गुन्हे मागे नाही
मराठा आरक्षणाच्या संदर्भात गुन्हे मागे घेणे संदर्भात कोणतीही बैठक झालेली नाही. पहिल्या दिवसापासून स्पष्ट भूमिका आमच्या सरकारची आहे की ज्या ठिकाणी आंदोलनादरम्यान शासकीय संपत्तीचे नुकसान झाले तेथील गुन्हे मागे घेता येणार नाहीत. यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाचे आदेश आहेत. मागील अधिवेशनातही मी याबाबत आकडेवारीसह माहिती दिली आहे.
आयटी कंपनीमधील कथित धर्मांतर
नाशिकमधील आयटी कंपनीच्या प्रकरणाबाबत मी कालच बोललो आहे. त्या संदर्भात सखोल चौकशी सुरू असून दोषींवर कारवाई करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.