

नागपूर : मराठा आरक्षण जीआर संदर्भात आज महसूलमंत्री आणि ओबीसी संदर्भात स्थापन मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलेले विधान वाद वाढविणारे ठरू शकते. हैद्राबाद गॅझेटमध्ये केवळ नोंद मिळाली म्हणून त्याआधारे सर्टिफिकेट देणार नाही. अधिकारी हे नियमाप्रमाणेच सही करतील. कुठलेही कास्ट सर्टिफिकेट चॅलेंज होऊ शकते असे महसूलमंत्री बावनकुळे यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले. हैद्राबाद गॅझेटच्या अंमलबजावणीवरून ज्येष्ठ मंत्री छगन भुजबळ यांची नाराजी नाही. आक्षेप आणि संभ्रम आहे, तो दूर करू. कुठल्या वाक्याबद्दल संभ्रम आहे त्यावर चर्चा करून तोडगा काढू असेही सांगितले.
हलाल टाउनशिप होवू देणार नाही
रायगड कर्जत येथील हलाल लाईफस्टाईल टाउनशिपचा मुद्दा सध्या गाजत आहे. हलाल टाऊनशिपवाल्यावर कारवाई करू. त्याच्यावर निश्चितच कारवाई होईल, अशी ग्वाही महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. अशा कोणत्याही टाऊनशिपला मान्यता देणार नाही. हलालच्या नावावर कुठलीही टाऊनशीप होणार नाही, असेही सांगितले.
दरम्यान,नागपूर जिल्हा परिषद निवडणुकीत लागू करण्यात आलेल्या झिरो रोस्टर संदर्भात अनुसूचित जाती-जमातीच्या लोकांनी उच्च न्यायालय, नागपूर येथे याचिका दाखल केली आहे. या रोस्टरमुळे काही जिल्हा परिषद सर्कलमध्ये फिरते आरक्षण लागू झाले नाही आणि त्यामुळे आरक्षणाचा लाभ मिळाला नाही, असे अर्जदारांचे म्हणणे आहे. यावर बोलताना बावनकुळे यांनी याचिका दाखल करणे हा याचिकाकर्त्याचा अधिकार आहे. राज्य शासन कुठलाही अधिनियम कधीही वापरू शकते, ५ रोस्टर झाले, ६ व्या रोस्टरसाठी लोक मिळत नाही, विधी विभागाचे मत घेऊन रोस्टरचा निर्णय घेतला, आम्ही आमची बाजु मांडू असेही ते म्हणाले.
नेहमी टीकेची झोड उठवणाऱ्या शिवसेनेच्या मुखपत्रातून यंदा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर कौतुकाची थाप देण्यात आली आहे. मराठा आरक्षणाच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ‘सामना’मधून फडणवीस यांच्या संयमी व संवेदनशील भूमिकेचे जाहीर कौतुक करण्यात आले आहे. “मुख्यमंत्र्यांनी तोडगा काढला आणि आंदोलनाचा शेवट गोड झाला,” अशा शब्दांत फडणवीस यांच्या भूमिकेचा गौरव करण्यात आला आहे. "त्यांच्यावर चौफेर टीका होत असतानाही ते विचलित झाले नाहीत', असे गौरवोद्गारही सामनामधून नोंदवले गेले. यावर बोलताना बावनकुळे यांनी "सामना'कडून हीच अपेक्षा आहे. त्यांनी नेहमी कौतुक करावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.