

नागपूर - विद्यापीठाच्या परीक्षा वेळेत व्हाव्या, निकाल वेळेत लागावे, प्राध्यापक भरती पारदर्शक आणि विद्यापीठातील भ्रष्टाचार दूर व्हावा अशा अनेक मागण्यासाठी आज बुधवारी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठावर मोर्चाने जोरदार धडक दिली.
एका सभेनंतर पदाधिकारी, कार्यकर्ते बरेच आक्रमक झाले त्यांनी पोलीस बॅरिकेड्स तोडून थेट विद्यापीठात जाण्याचा प्रयत्न केल्याने वातावरण तापले. धक्काबुक्की झाली. मोठ्या प्रमाणात पोलीस, दंगल नियंत्रण पथक यावेळी तैनात करण्यात आले. आमचेच शासन असले तरी शासनाशी आम्हाला देणेघेणे नाही.
विद्यापीठाचे प्रश्न विद्यापीठ पातळीवर सुटावेत या दृष्टीने आम्हाला कुलगुरूंना भेटण्यासाठी आत जाऊ द्या, असा पवित्रा स्वीकारण्यात आल्याने धक्काबुक्की झाली. मात्र, विद्यार्थ्यांचे आक्रमक रूप पाहून पोलिस विद्यापीठाच्या आत सोडण्यास तयार नसल्याने अखेरीस विद्यापीठ प्रवेशद्वारासमोरच अभाविप कार्यकर्त्यांनी कुलगुरू विरोधात घोषणाबाजी केली.