

नागपूर: स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत महायुती, आघाडी मोडीत निघण्याची चिन्हे आहेत. काँग्रेस स्वबळावर लढू शकते हे लक्षात घेता राष्ट्रवादीनेही त्यांचा हात सोडल्यात जमा आहे. राज्यात अनेक जागी दोन राष्ट्रवादी भाजपला रोखण्यासाठी एकत्रित येत असल्याच्या चर्चा असताना नागपुरात देखील वेगळे समीकरण पहायला मिळू शकते.
काँग्रेस पक्ष वगळून इतर समविचारी मित्र पक्षाची बैठक राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या पुढाकाराने संपन्न झाली. या बैठकीत आगामी नगर पंचायत, नगर परिषद, जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूक एकत्रित लढविण्याचे नियोजन करण्यात आले. यासाठी अधिकृत तिसऱ्या आघाडीची घोषणा लवकरच करण्यात येऊ शकते अशी माहिती प्रविण कुंटे पाटील जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार यांनी दिली.
बैठकीत राष्टवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षातर्फे जिल्हाध्यक्ष प्रविण कुंटे पाटील, पक्षाचे निवडणूक प्रभारी सलिल देशमुख, किशोर गजभिये, शैलेंद्र तिवारी, शिवसेना उद्धव ठाकरे गट जिल्हा प्रमुख उत्तम कापसे, आम आदमी पार्टीचे प्रतिनिधी सोनू फटिंग, राष्ट्रीय गोंडवाना पार्टीचे प्रशील कोडापे, रजत नेहरा गवळी, सूरज अत्राम, प्रशिक गाडगे, शुभम परटेकी अखिल भारतीय युवा विकास परिषदचे राधेशाम टेकाम, भारतीय कम्युनिस्ट पार्टीचे गजानन घोडे, भिम आर्मीचे अंकित राऊत, रिपब्लिकन लोकशाही मोर्चाचे अरुण गाडे, ओबीसी बहुजन आघाडीचे डॉ रमेश पिसे प्रामुख्याने उपस्थित होते.