नागपूर; पुढारी वृत्तसेवा : नागपुरातील गिट्टीखदान पोलीस स्टेशन हद्दीतील सीपीडब्ल्यूडी कॉलनी, सेमिनरी हिल्समध्ये बुधवारी दुपारी उघडकीस आलेल्या एका वृद्ध जोडप्याच्या मृत्यूचे गूढ कायम आहे. मृत दीपक गजभिये (वय ५७) हे पंख्याला लटकलेल्या अवस्थेत तर त्यांची पत्नी विद्या (वय ५३) या बेडवर पडलेल्या होत्या. ही घटना क्वार्टर क्र. ३६०, बिल्डिंग क्र. १२, टाईप २, सीपीडब्ल्यूडी कॉलनी येथे घडली.
दीपक गजभिये हे भारतीय वायुसेनेच्या मुख्यालय मेंटेनन्स कमांड (HQMC) मध्ये ग्रेड-डी कर्मचारी होते. त्यांच्या नावाने जय भीम चौक, कामठी रोडवर एक घर आहे. त्यांची पत्नी विद्या अर्धांगवायूग्रस्त आणि दोन तीन वर्षांपासून अंथरुणाला खिळून होत्या. दीपक यांनी स्वतः जीवन संपवण्यापूर्वी पत्नीचा गळा दाबून किंवा विष पाजून हत्या केली असावी असे प्राथमिक तपासात दिसून आले. बुधवारी दुपारी अडीचच्या सुमारास ही घटना घडल्याचे समजते, त्या जोडप्याचा मुलगा प्रशीक (वय २७) आणि मुलगी प्रेरणा (वय २४) हे काही कामानिमित्त कामठी पोस्ट ऑफिसमध्ये गेले होते. परत आल्यानंतर आई-वडिलांचा मृत्यू झाल्याचे पाहून त्यांना धक्काच बसला. घटनेची माहिती मिळताच गिट्टीखदान पोलीस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा केल्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी मेयो रुग्णालयात पाठवण्यात आला. शवविच्छेदन अहवालानंतर विद्याच्या मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल, असे पोलिसांनी सांगितले.
हेही वाचा :