

Nagpur NOC for candidates
नागपूर : महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारांना अडचण जाणार नाही, याची काळजी घेतली जात असून, सर्व झोन कार्यालयांमध्ये निवडणूक अधिकारी राहणार आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी उमेदवारांना आवश्यक ना हरकत पत्रे घेणे सोईचे व्हावे, यासाठी महानगरपालिकेच्या मुख्यालयात एक खिडकी व्यवस्था सुरू केली आहे.
झोन स्तरावरील आवश्यक कागदपत्रे व परवानग्या या झोनल कार्यालयातूनच दिल्या जाणार आहेत. महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकी दरम्यान सर्व राजकीय पक्षांनी राज्य निवडणूक आयोगाने घालून दिलेल्या आदर्श निवडणूक आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी केले आहे.
निवडणूक आचारसंहितेच्या संदर्भात शहरातील राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींशी आज चर्चा केली. यावेळी मुख्य वित्त व लेखा अधिकारी सदाशिव शेळके, उपायुक्त निर्भय जैन , उपायुक्त मिलिंद मेश्राम, सहाय्यक आयुक्त श्याम कापसे प्रामुख्याने उपस्थित होते.
निवडणुकीसाठी उमेदवारांना ऑफलाईन पद्धतीने अर्ज दाखल करावे लागणार आहेत. उमेदवारांसाठी खर्चाची मर्यादा 15 लाख रुपये एवढी आहे. उमेदवार किंवा राजकीय पक्षांनी जातीय तेढ निर्माण होईल किंवा सामाजिक सौहार्द बिघडविणारा मजकूर, छायाचित्रे किंवा चित्रफित पोस्ट करू नये, असेही आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी यांनी स्पष्ट केले.