

Nagpur court bomb threat
नागपूर: मुंबई पाठोपाठ नागपूर जिल्हा सत्र न्यायालयाला देखील बॉम्बने उडवून देण्याची धमकी गुरुवारी (दि.१८) देण्यात आली आहे. प्राथमिक तपासात हा खोडसाळपणा असल्याचे उघड झाले असले तरी पोलिसांनी ही धमकी गांभीर्याने घेत या धमकीची सत्यता पडताळून पाहण्यासाठी परिसरात बंदोबस्तात वाढ केली आहे.
श्वानपथक, बॉम्बशोधक, बॉम्बनाशक पथकाने जिल्हा सत्र न्यायालय परिसराची कसून तपासणी केली. तर दुसरीकडे कडक बंदोबस्त असला तरी न्यायालयातील सर्व कामकाज सुरळीत सुरू आहे. जिल्हा सत्र न्यायालयातील नवव्या माळ्यावर हा बॉम्ब ठेवण्यात आल्याची व बॉम्बने न्यायालय उडून देण्याची धमकी देणारा इमेल आल्यानंतर पोलीस यंत्रणा खडबडून जागी झाली.
गेल्या काही दिवसात सातत्याने महत्त्वाच्या शासकीय इमारती उडून देण्याची धमकी दिली जात आहे. हिवाळी अधिवेशन सुरू होण्यापूर्वी देखील जिल्हाधिकारी कार्यालय टेकडी गणेश मंदिर येथे बॉम्ब ठेवला जाणार असल्याची धमकी देण्यात आली होती. आज मुंबई कोर्टाला देखील अशाच प्रकारची धमकी देण्यात आली. एकंदरीत राज्यात सातत्याने महत्त्वाच्या ठिकाणांवर बॉम्ब ठेवल्याच्या धमक्या येत आहेत.