

NCP Election Strategy
नागपूर : एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार आणि शरद पवार गट एकत्रित येण्याच्या चर्चा सुरू असतानाच दोन्ही पक्ष स्वबळाची चाचपणी करीत आहेत. महायुतीतून सन्मान जनक वाटा न मिळाल्यास अजितदादा गट स्वतंत्र लढण्याच्या विचारात आहे. आज त्यांची बैठक होत आहे. तर दुसरीकडे शरद पवार गटाची महाविकास आघाडीत सन्मान न मिळाल्यास वेगळे लढू, अशी भूमिका आहे. शनिवारी त्यांच्या इच्छुकांच्या मुलाखती होणार असल्याचे शहराध्यक्ष दुनेश्वर पेठे यांनी स्पष्ट केले.
या मुलाखती माजी गृहमंत्री अनिल देशमुख, माजी मंत्री रमेश बंग, शहराध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटचे शहराध्यक्ष दुनेश्वर पेठे तसेच पक्षाचे प्रदेशस्तरीय पदाधिकारी यांच्या उपस्थितीत व मार्गदर्शनाखाली होणार आहेत. इच्छुक उमेदवारांची क्षमता, जनसंपर्क, संघटनात्मक कार्य, सामाजिक बांधिलकी तसेच पक्षनिष्ठा या विविध निकषांवर मुलाखतीद्वारे पडताळणी करण्यात येणार आहे. सक्षम, जनतेशी जोडलेले व पक्षाची विचारधारा पुढे नेणारे उमेदवार निवडण्यावर पक्ष नेतृत्वाचा भर असल्याचे पेठे यांनी सांगितले.
सदर मुलाखती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार गट) पक्ष कार्यालय, गणेश पेठ येथे आयोजित करण्यात आल्या आहेत. सर्वपक्षीय मुलाखतींमुळे शहरातील राजकीय हालचालींना वेग आला असून, आगामी निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्ष सज्ज झाल्याचे दिसून येत आहे.