

नागपूर : नागपूर महानगरपालिका आरोग्य विभागाच्या अंतर्गत सुरु झालेल्या मेट्रोपॉलिटन सर्व्हेलन्स युनिट (एमएसयू) च्या कामाची दखल जागतिक पातळीवर घेण्यात आली. जागतिक बँक (वर्ल्ड बँक) आणि केंद्र सरकारच्या आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या संयुक्त पथकाने सोमवारी (दि.१९) नागपूरला भेट देऊन मेट्रोपॉलिटन सर्व्हेलन्स युनिट (एमएसयू) च्या कामाची माहिती घेतली.
वर्ल्ड बँकचे डॉ. गुरु राजेश जामी, डॉ. लुंग्वू, आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाचे डॉ. विजेंद्र कटरे या चमूने मनपा मेट्रोपॉलिटन सर्व्हेलन्स युनिट च्या के. टी. नगर येथील ६ मजली इमारतीची पाहणी केली. यावेळी त्यांनी के. टी. नगर येथील 'एमएसयू'च्या कार्यालयामध्ये अधिकाऱ्यांशी संवाद साधला. यानंतर चमूने मनपा मुख्यालयाला भेट दिली. मनपा अतिरिक्त आयुक्त श्रीमती वसुमना पंत यांच्या सभा कक्षात बैठक पार पडली.यावेळी अतिरिक्त वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. नरेंद्र बहिरवार, साथरोग अधिकारी डॉ. गोवर्धन नवखरे, 'एमएसयू'चे वरिष्ठ सार्वजनिक आरोग्य तज्ञ डॉ. वीरेंद्र वानखेडे, सार्वजनिक आरोग्य तज्ञ डॉ. मिथुन खेरडे, सहायक सार्वजनिक आरोग्य तज्ञ डॉ. शुशांकी बनसोड, प्रशासकीय अधिकारी डॉ. सोनल संघी, प्रशिक्षण व्यवस्थापक डॉ. अश्विनी वाघे यांच्यासह एमएसयू चे सर्व अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.
केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय, महाराष्ट्र राज्य आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय व नागपूर महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने मेट्रोपॉलिटन सर्व्हेलन्स युनिटची स्थापना करण्यात आली आहे. या प्रकल्पाला जागतिक बँक तर्फे ‘प्रधानमंत्री आयुष्मान भारत हेल्थ इन्फ्रास्ट्रक्चर मिशन’ (PM-ABHIM) अंतर्गत अर्थसहाय्य आहे. या अनुषंगाने जागतिक बँक (वर्ल्ड बँक) व केंद्र सरकारच्या आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या चमूने नागपूर एमएसयूला भेट देत कामाचा आढावा घेतला. मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी व अतिरिक्त आयुक्त श्रीमती वसुमना पंत यांच्या मार्गदर्शनात व वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर यांच्या नेतृत्वात एमएसयू च्या अधिकाऱ्यांनी चमूला सविस्तर माहिती दिली. एमएसयू चे डॉ. वीरेंद्र वानखेडे यांनी सादरीकरणातून एमएसयू च्या स्थापनेपासूनची सविस्तर माहिती दिली. सध्या सुरु असलेले सार्वजनिक आरोग्य व रोग निगराणीचे कार्य व भेडसावणाऱ्या अडचणी आणि त्यावर एमएसयू कडून सुरु असलेले कार्य याबाबत देखील त्यांनी चमूला अवगत केले.
वर्ल्ड बँक चे डॉ. गुरु राजेश जामी, डॉ. लुंग्वू, आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाचे डॉ. विजेंद्र कटरे या चमूने मनपा मेट्रोपॉलिटन सर्व्हेलन्स युनिट च्या कामावर समाधान व्यक्त करीत सुरु असलेल्या कामाचे कौतुक केले. ‘वन हेल्थ’ अंतर्गत पशुसंवर्धन विभाग, पर्यावरण विभाग, जलप्रदाय विभाग आदींसोबत आंतरविभागीय समन्वय वाढविण्याची त्यांनी सूचना केली. यासोबतच माहितीचे अधिक प्रभावीपणे विश्लेषण करावे यात ‘एआय’ चा उपयोग करून गती द्यावी. शहरातील खासगी हॉस्पिटल आणि खासगी लॅब यांच्यासोबत सुद्धा समन्वय वाढवून सर्वेक्षणातील माहितीच्या विश्लेषणामध्ये त्याचा उपयोग करावा, अशाही सूचना चमूने नोंदविल्या.