

Minor Girl Assault Nagpur
नागपूर : नागपूरच्या मानकापूर परिसरात एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. एका नराधम पित्याने स्वतःच्याच ८ वर्षीय दिव्यांग मुलीवर गेल्या वर्षभरापासून लैंगिक अत्याचार केल्याचा घृणास्पद प्रकार उघडकीस आला आहे. धक्कादायक बाब म्हणजे, या गुन्ह्यात पीडितेच्या आजोबांनीही साथ दिल्याचा आणि पीडितेच्या आईला धमकावल्याचा आरोप आहे. पोलिसांनी याप्रकरणी पिता आणि आजोबा या दोन्ही आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत.
ही घटना नागपूरच्या मानकापूर पोलीस स्टेशन हद्दीत घडली. पीडित मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीनुसार, तिचा ४१ वर्षीय पती गेल्या वर्षी जानेवारी ते डिसेंबर या कालावधीत आपल्या ८ वर्षांच्या दिव्यांग मुलीवर सतत अत्याचार करत होता.पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी पिता मुलीला अश्लील व्हिडिओ दाखवून तिच्यासोबत अश्लील चाळे आणि दुष्कृत्य करायचा.
पीडितेच्या आईने या कृत्याला विरोध केला, तेव्हा आरोपी पतीने तिला मारहाण करून तोंड बंद ठेवण्याची धमकी दिली. अखेर हतबल झालेल्या मातेने जेव्हा ही बाब आपल्या ७० वर्षीय सासऱ्यांच्या (मुलीचे आजोबा) कानावर घातली,मात्र त्यांनीही याकडे दुर्लक्ष केले. या गंभीर प्रकरणी संवेदनशीलता दाखवली नाही. उलट, "ती त्याची मुलगी आहे, तो काहीही करेल" असे म्हणत, कुणाला काही सांगितल्यास माय-लेकीला बेपत्ता करण्याची धमकी दिली.
शेवटी हिंमत दाखवित पीडित मुलीच्या आईने मानकापूर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार नोंदवली. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तातडीने कारवाई करत दोन्ही आरोपींना अटक केली आहे. पोलिस निरीक्षक हरेश काळसेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत.