Nagpur news | महालक्ष्मी सरसचा डंका: १० कोटींची विक्री; राज्यातील ३६ जिल्ह्यांत उभारणार 'उमेद मॉल'

Nagpur news | महालक्ष्मी सरसचा डंका: १० कोटींची विक्री; राज्यातील ३६ जिल्ह्यांत उभारणार 'उमेद मॉल'

यावेळी भविष्यात उभारल्या जाणाऱ्या १०० हून अधिक वाचनालयांच्या उपक्रमाचाही शुभारंभ झाला
Published on

नागपूर: "महालक्ष्मी सरस प्रदर्शन हे केवळ वस्तू विक्रीचे ठिकाण नसून महिला बचत गटांसाठी हक्काची आणि प्रभावी बाजारपेठ आहे. महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी राज्यातील सर्व ३६ जिल्ह्यांत 'उमेद मॉल' उभारण्यात येतील," अशी महत्त्वाची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी येथे केली.

रेशीमबाग मैदान येथे आयोजित 'महालक्ष्मी सरस २०२६' च्या भव्य प्रदर्शनाला मुख्यमंत्र्यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी महिला बचत गटांच्या स्टॉल्सची पाहणी करून महिला उद्योजकांशी संवाद साधला.

राज्यात तीन ठिकाणी आयोजित होणाऱ्या महालक्ष्मी सरस प्रदर्शनांच्या माध्यमातून सुमारे १०० कोटी रुपयांची उलाढाल होत असून, यामुळे महिलांच्या उद्योगांना मोठी चालना मिळत आहे. नागपूरच्या या प्रदर्शनात ४०४ स्टॉल्स उभारण्यात आले असून, आतापर्यंत १० कोटी रुपयांच्या वस्तूंची विक्री झाली आहे. राज्यात १ कोटी महिलांना 'लखपती दीदी' बनवून त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचे उद्दिष्ट सरकारने ठेवले आहे. नागपूर जिल्हा परिषदेने राबविलेल्या ४८ नाविन्यपूर्ण उपक्रमांचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. तसेच, भविष्यात उभारल्या जाणाऱ्या १०० हून अधिक वाचनालयांच्या उपक्रमाचाही शुभारंभ झाला.

"महिला आता अर्थव्यवस्थेच्या प्रमुख घटक बनल्या आहेत. ग्रामविकास विभागाच्या योजनांमुळे महिला सशक्तीकरणाला वेग आला असून, पहिल्या टप्प्यात १३ जिल्ह्यांमध्ये 'उमेद मॉल'चे काम सुरू होईल."

— जयकुमार गोरे, ग्रामविकास मंत्री

उपस्थित मान्यवर

या सोहळ्याला महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, अर्थ व नियोजन राज्यमंत्री आशिष जयस्वाल, आमदार कृपाल तुमाने, कृष्णा खोपडे, चरणसिंग ठाकूर यांसह जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर, झेडपीचे सीईओ विनायक महामुनी आणि उमेद अभियानाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन डॉ. कमलकिशोर फुटाणे यांनी केले, तर सूत्रसंचालन अमोल बाविस्कर यांनी केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news