

Nagpur Ration Grain Scam
नागपूर : नागपूर शहरातील हुडकेश्वर परिसरात कथित शासकीय रेशन धान्याच्या अवैध साठ्याचा पर्दाफाश करण्यासाठी गेलेल्या पत्रकारावर भरदिवसा जीवघेणा हल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडली. हल्लेखोरांनी लोखंडी रॉडने बेदम मारहाण करून पत्रकाराचे अपहरण केले आणि दुसऱ्या ठिकाणी नेऊन पुन्हा मारहाण केली. या हल्ल्यात पत्रकार संदीप भीमराव सुरडकर गंभीर जखमी झाले असून पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुद्ध गंभीर गुन्हे दाखल करून तपासाला वेग दिला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संदीप सुरडकर हे 'एक विश्व' साप्ताहिकाचे संपादक असून ते यूट्यूब न्यूज चॅनलही चालवतात. सामाजिक कार्यकर्ते तथा 'मिशन बहुजन'चे संस्थापक राकेश दशरथ घारगावे यांनी प्रभातनगर परिसरातील एचपी गॅस गोदामाजवळील एका घरात मोठ्या प्रमाणात शासकीय रेशन धान्याचा अवैध साठा असल्याची माहिती सुरडकर यांना दिली होती. या माहितीची खातरजमा करण्यासाठी दोघेही संबंधित ठिकाणी गेले.
घटनास्थळी पोहोचल्यानंतर त्यांना तीन टाटा बोलेरो वाहनांमध्ये भरलेले रेशन धान्य तसेच घरात मोठ्या प्रमाणात धान्याचा साठा असल्याचे दिसून आल्याचा दावा करण्यात आला. संशय बळावल्याने सुरडकर यांनी तत्काळ पोलिसांना याची माहिती दिली. मात्र, काही क्षणांतच तीन ते चार अज्ञात आरोपी तेथे आले आणि कोणतीही चर्चा न करता लोखंडी रॉडने सुरडकर यांच्यावर बेछूट हल्ला चढवला. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे राकेश घारगावे यांनी स्वतःचा जीव वाचवण्यासाठी घटनास्थळावरून पळ काढला.
हल्लेखोरांनी गंभीर जखमी अवस्थेतील संदीप सुरडकर यांना जबरदस्तीने काळ्या रंगाच्या टाटा हॅरिअर कारमध्ये बसवून त्यांचे अपहरण केले. त्यानंतर त्यांना खरबी चौक परिसरात नेऊन पुन्हा बेदम मारहाण करण्यात आली. दरम्यान, पोलिसांचे वाहन येत असल्याचे लक्षात येताच आरोपींनी सुरडकर यांना रस्त्यावर सोडून तेथून पलायन केले.
घटनेची माहिती मिळताच नंदनवन पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत जखमी पत्रकाराला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. प्राथमिक उपचारानंतर ही घटना हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडल्याचे स्पष्ट झाल्याने पुढील तपासासाठी प्रकरण हुडकेश्वर पोलिसांकडे वर्ग करण्यात आले.
फिर्याद आणि वैद्यकीय अहवालाच्या आधारे हुडकेश्वर पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुद्ध जीवघेणा हल्ला, अपहरण आणि इतर गंभीर कलमांअंतर्गत गुन्हे दाखल केले आहेत. गुन्हे शोध पथकाने काही संशयितांना ताब्यात घेतल्याची माहिती असून त्यांची कसून चौकशी सुरू आहे. या प्रकरणामागे कथित रेशन धान्याच्या काळाबाजाराचे पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न होता का, याचाही तपास पोलिसांकडून विविध अंगांनी केला जात आहे.