Nagpur Ganeshothav | पितृपक्षात गणपतीची स्थापना! नागपूरच्या 239 वर्षांच्या ऐतिहासिक मस्कऱ्या गणपतीचे रविवारी आगमन

27 सप्टेंबरला भव्य मिरवणूक; 29 सप्टेंबरला स्थापना, यंदा 18 हातांची सात फूट उंच गणेशमूर्ती
Nagpur Ganeshothav
Nagpur Ganeshothav
Published on: 
Updated on: 

Nagpur Ganeshothav नागपूर : उपराजधानीतील भोसलेकालीन परंपरेचा वारसा जपणाऱ्या ऐतिहासिक मस्कऱ्या (हडपक्या) गणपतीचे रविवार, 27 सप्टेंबर रोजी सायंकाळी 6 वाजता आगमन होणार आहे. त्यानंतर मंगळवार, 29 सप्टेंबर रोजी गणेशमूर्तीची विधिवत स्थापना केली जाणार आहे. आयोजकांनी दिलेल्या माहितीनुसार, इ.स. 1787 मध्ये श्रीमंत राजे खंडोजी महाराज भोंसले ऊर्फ चिमणाबापू यांनी सुरू केलेल्या या परंपरेला यंदा 239 वर्षे पूर्ण होत आहेत.

मस्कऱ्या अर्थात हडपक्या गणपतीच्या उत्सवामागे ऐतिहासिक परंपरा आहे. आयोजकांच्या माहितीनुसार, श्रीमंत राजे खंडोजी महाराज भोंसले हे बंगालच्या स्वारीवर गेले होते. विजय मिळवून परत येईपर्यंत कुळाचारी गणपतीचे विसर्जन झाले होते. त्यामुळे बंगालवरील विजयाचा आनंद साजरा करण्यासाठी त्यांनी पितृपक्षात मस्कऱ्या गणपतीची स्थापना केली. यानिमित्त नकला, लावण्या, खडी गंमत यांसारख्या लोककला व मनोरंजनाच्या कार्यक्रमांचे आयोजन करून हा आनंदोत्सव सार्वजनिक स्वरूपात साजरा करण्यात आला.

तेव्हापासून पितृपक्षात मस्कऱ्या गणपतीची स्थापना करण्याची परंपरा अखंडपणे सुरू असल्याचे आयोजकांचे म्हणणे आहे. सध्या श्रीमंत राजे मुधोजी महाराज भोंसले यांच्या मार्गदर्शनात आणि ‘महाराजा ऑफ नागपूर ट्रस्ट’च्या व्यवस्थापनात हा उत्सव साजरा केला जातो.

18 हातांची सात फूट उंच मूर्ती

श्रीमंत राजे खंडोजी महाराज भोंसले यांच्या काळात मस्कऱ्या गणपतीची 18 हातांची आणि 21 फूट उंच मूर्ती स्थापित केली जात असल्याचे सांगण्यात येते. त्याच परंपरेचा संदर्भ कायम ठेवत यंदा 18 हातांची आणि सात फूट उंच गणेशमूर्ती स्थापित करण्यात येणार आहे. हा गणपती ‘नवसाला पावणारा’ अशी भाविकांमध्ये श्रद्धा असल्याने उत्सवाला विशेष महत्त्व आहे.

तुळशीबागेतून निघणार आगमन मिरवणूक

मस्कऱ्या गणपतीची आगमन मिरवणूक रविवार, 27 सप्टेंबर रोजी सायंकाळी 6 वाजता सी. पी. अँड बेरार महाविद्यालय, तुळशीबाग येथून सुरू होईल. तेथून ज्युनियर भोंसला पॅलेस, राजे प्रतापसिंह भोंसले चौक (सुतिकागृह), कोतवाली पोलिस स्टेशन चौक, नरसिंग टॉकीज चौकमार्गे मिरवणूक सीनियर भोंसला पॅलेस येथे पोहोचणार आहे. यंदा या ऐतिहासिक परंपरेला 239 वर्षे पूर्ण होत असल्याने मस्कऱ्या गणपतीच्या आगमन आणि स्थापना सोहळ्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

पुणे शहरातील सर्व अपडेट्स आता WhatsApp वर; आत्ताच जॉईन करा
logo
Pudhari News
pudhari.news