

नागपूर - महानगरपालिकेच्या आवाहनानुसार पर्यावरणपूरक गणेशोत्सवादरम्यान संकलित दोनशे टन पेक्षा अधिक निर्माल्यापासून खत निर्मिती केली जात आहे. बाप्पांच्या निर्माल्यापासून गांडूळ खत निर्माण करण्यात येणार असून, या खताचा वापर उद्यान/गार्डन मध्ये खत म्हणून वापर करण्यात येणार आहे.
नागपूर महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त श्रीमती वसूमना पंत यांनी )भांडेवाडी परिसरातील गणेशोत्सवाच्या निर्मल्ल्यापासून खत निर्मिती करणाऱ्या प्रकल्पाला भेट देऊन पाहणी केली. या भेटीदरम्यान त्यांनी खत निर्मितीच्या संपूर्ण प्रक्रियेची माहिती घेतली आणि प्रकल्पाच्या कामकाजाचे कौतुक केले.
याप्रसंगी मुख्य स्वच्छता अधिकारी डॉ. गजेंद्र महल्ले, रोहिदास राठोड यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. गणेशोत्सवादरम्यान शहरातून मोठ्या प्रमाणात बाप्पांना वाहिलेले फुलहार, दूर्वा आणि इतर निर्माल्य संकलित करण्यात आले. मनपाच्या भांडेवाडी येथील प्रकल्पात या निर्माल्याचा वापर करून खत तयार केले जाते. गेल्या वर्षी गणेशोत्सवाच्या दहा दिवसांत सुमारे १८७ टन निर्माल्य गोळा करण्यात आले होते, ज्यापासून १८ टन गांडूळ खत तयार करण्यात आले. हे खत नंतर शहरातील उद्याने आणि बागांमध्ये वापरले जाते. यंदा 200 टनच्या वर निर्माल्य संकलित करण्यात आले आहे. त्यामुळे खत निर्मितीचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.