

Nagpur Electricity Theft Case
नागपूर: वीज चोरी करणाऱ्या एका ग्राहकाला नागपूरच्या विशेष न्यायालयाने जोरदार दणका दिला आहे. न्यायालयीन कामकाज समाप्तीपर्यंत तुरुंगवासाची शिक्षा आणि दहा हजार रुपये दंड ठोठावला आहे.
जिल्हा न्यायाधीश-3 आणि अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. एच. ग्वालानी यांनी विशेष प्रकरण क्र. 53/2022 मध्ये ग्राहक शमशेरा बेगम शेख बब्बू यांना दोषी ठरवित ही शिक्षा सुनावली. ग्राहक शमशेरा बेगम शेख बब्बू यांचे वीज बिल थकीत असल्यामुळे महावितरणने त्यांची वीज जोडणी नियमानुसार खंडित केली होती.
मात्र, वीज बिल न भरता आणि कोणतीही पूर्वपरवानगी न घेता, आरोपी ग्राहकाने ही खंडित केलेली वीज जोडणी पुन्हा अवैधपणे जोडून वीज वापरण्यास सुरुवात केली. ही बाब महावितरणच्या निदर्शनास येताच, कंपनीने तत्काळ कारवाई करत 2021 साली मध्ये नंदनवन पोलीस स्टेशनमध्ये संबंधित ग्राहकाविरुद्ध तक्रार दाखल केली होती.
या प्रकरणाची सुनावणी करताना, जिल्हा न्यायाधीश-3 आणि अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. एच. ग्वालानी यांच्या न्यायालयाने शमशेरा बेगम शेख बब्बू यांना दोषी ठरवले.