

Nagpur Power Outage
नागपूर : रस्ते रुंदीकरण, ड्रेनेज लाईन टाकणे अशा विविध कामांमुळे नागपूर शहरात गेल्या तीन महिन्यांत तब्बल 120 वेळा भूमिगत वीजवाहिन्या तोडण्यात आल्याने वीजपुरवठ्यात व्यत्यय आला. यापैकी 82.5 टक्के घटनांना सरकारी संस्थाच जबाबदार आहेत. यामुळे महावितरणला कोट्यवधी रुपयांचे नुकसान सहन करावे लागले. वारंवार वीजपुरवठा खंडित झाल्याने नागरिकांच्या रोषाला महावितरणला सामोरे जावे लागले.
महावितरणने दिलेल्या आकडेवारीनुसार, एप्रिल ते जून 2025 या तीन महिन्यांत शहरात वीज खंडित होण्याचे प्रमाण प्रचंड वाढले. याच काळात विविध पायाभूत सुविधांच्या कामांमुळे वीजवाहिन्या 120 वेळा बाधित झाल्या. एप्रिलमध्ये 28, मे महिन्यात 49 आणि जूनमध्ये 43 वेळा वीज वाहिन्यांना हानी पोहोचली. यापैकी तब्बल 99 म्हणजेच 82.5 टक्के नुकसान सरकारी संस्थांमुळे झाले आहे, तर केवळ 12 वेळा खाजगी संस्थांमुळे वीजवाहिन्या तुटल्या. विशेषतः, नागपूर महानगरपालिका आणि नागपूर सुधार प्रन्यासने महावितरणच्या भूमिगत वाहिन्यांचे 57 वेळा नुकसान केले.
सरकारी संस्था अनेकदा कामाची पूर्वकल्पना न देता खोदकाम सुरू करतात, ज्यामुळे भूमिगत वीजवाहिन्या तुटतात. लहानसहान दुरुस्त्या लगेच करता येतात, परंतु मोठ्या नुकसानीमुळे दुरुस्तीला वेळ लागतो आणि वीजपुरवठा जास्त काळ खंडित राहतो.
नागपूर महानगरपालिका आणि नागपूर सुधार प्रन्यासने 57 वेळा वीजवाहिन्यांचे नुकसान केले, तर त्यापाठोपाठ महारेल (13 वेळा), मेट्रो (5 वेळा), भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (7 वेळा), ऑरेंज सिटी वॉटर (11 वेळा), सार्वजनिक बांधकाम आणि जागतिक बँक विभाग (5 वेळा) आणि रेल्वेने (1 वेळा) वीजवाहिन्या तोडल्या आहेत.
शहरातील महाल विभागात उड्डाणपुलांसह इतर विकासकामांमुळे सर्वाधिक म्हणजेच 40 ठिकाणी वीजवाहिन्यांचे नुकसान झाले आहे. याशिवाय, काँग्रेस नगर विभाग (30), सिव्हिल लाईन्स (20) आणि बुटीबोरी (18) येथेही वीजवाहिन्या मोठ्या प्रमाणात क्षतीग्रस्त झाल्या आहेत.