

Run for Constitution Nagpur
नागपूर : लॉ फोरम नागपूर च्या वतीने युवा दिनाच्या निमित्ताने आयोजित “संविधानासाठी दौड - मॅराथॉन 2026” हा उपक्रम देशभक्तीच्या भावनेतून यशस्वीपणे पार पडला. 3 किलोमीटर लांबीच्या मॅराथॉनमध्ये सुमारे 350 हून अधिक धावपटूंनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
मॅराथॉनची सुरुवात संविधान चौक येथून झाली. विविध वयोगटांतील नागरिकांचा सक्रिय सहभाग होता. कार्यक्रमाची सुरुवात विनीत मोरे यांच्या नेतृत्वाखाली उत्साहवर्धक झुंबा वॉर्म-अप सत्राने झाली. त्यानंतर “वंदे मातरम्” या गीताचे सामूहिक गायन करण्यात आले. मान्यवरांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर मॅराथॉनला औपचारिकरित्या हिरवी झेंडी दाखवून प्रारंभ करण्यात आला.
संरक्षणम् सेवा प्रतिष्ठान यांच्या वतीने सादर करण्यात आलेले प्रदर्शन आकर्षण ठरले. ज्यामध्ये भारतीय संविधानातील महत्त्वाच्या बाबी प्रभावीपणे मांडण्यात आल्या. या प्रदर्शनीचा उद्देश नागरिकांमध्ये, विशेषतः तरुणांमध्ये, संविधानाबाबत जागरूकता निर्माण करणे हा होता.
या प्रसंगी विविध मान्यवर व कार्यकर्त्यांचा सन्मान करण्यात आला. त्यामध्ये ॲड. पल्लवी भावे, प्राचार्या, सेंट्रल इंडिया कॉलेज ऑफ लॉ व एलएलएम, नागपूर; रविंद्र बोकारे, नागपूर महानगर कार्यवाह, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ; ओशिन सिंह, संस्थापक – चाय : द टेस्ट ऑफ पंजाब; आनंद कटियारमल, संस्थापक – भावसार असोसिएट्स; पंकज कोठारी, नागपूर महानगर सह कार्यवाह, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ; तसेच गार्गी चौबे, लॉ फोरम नागपूरच्या माजी सदस्या व सध्या बाबासाहेब आंबेडकर स्कूल ऑफ लॉ येथील प्राध्यापिका यांचा समावेश होता.
कार्यक्रमादरम्यान भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन करण्यात आले. त्यानंतर मॅराथॉनच्या विजेत्यांची घोषणा करण्यात आली. महिला गटात, श्रीयशी मोहतकर हिने प्रथम क्रमांक पटकावला, तर विद्या धोटे द्वितीय व मोनी काटेखाये तृतीय क्रमांकावर राहिल्या. पुरुष गटात, प्रणय माहुले याने प्रथम क्रमांक मिळवला, तर तेजस बांकर द्वितीय व जयप्रकाश काल्हे तृतीय क्रमांकावर राहिले.