

नागपूर : मांजर दाखवतो असा बहाणा करीत एका 72 वर्षीय वृद्धाने दोन अल्पवयीन मुलींशी अश्लील चाळे केल्याची घटना नंदनवन परिसरात घडली. या घटनेची वाच्यता भेदरलेल्या मुलींनी केली आणि आरोपीचे घर दाखविले यानंतर संतप्त नागरिकांनी नंदनवन पोलिस स्टेशनला घेराव घालत या वृद्धाच्या अटकेची आणि तातडीने कठोर कारवाईची मागणी लावून धरली.
मुलींच्या नातेवाईकांच्या तक्रारीवरून पोलिसांनी विनयभंग, पोक्सो अन्वये गुन्हा दाखल केला. सेवकराम गणपतराव सोनकुसरे वय 72, गोपाळ कृष्णनगर असे गुन्हा दाखल इसमाचे नाव आहे. पोलिसांनी त्याला ताकीद देत सोडून दिले. सेवकराम हा विकृत, गुन्हेगारी मनोवृत्तीचा असून यापूर्वीही त्यांनी अल्पवयीन मुलींशी अश्लील चाळे केले आहेत.
तो शस्त्र घेऊन फिरतो आणि नागरिकांना धमकावतो असे सांगत सेवकरांमला तातडीने अटक करण्याची मागणी संतप्त जमावाने केली. भविष्यात काही आकस्मिक घटना घडल्यास नागरिक जबाबदार राहणार नाही असा इशाराही दिला.